शनिवार, ९ जून, २०१८

कॉपीरायटिंग आणि कंटेंट रायटिंग म्हणजे काय? दोन्हीमध्ये फरक काय?

Copy Writing and Content Writing in Marathi
 
कॉपीरायटिंग आणि कंटेंट रायटिंग यातला फरक पाहण्याआधी आपण COPYRIGHTS आणि COPYWRITING यामधला फरक काय ते पाहू. बरेचसे लोक यामध्ये गोंधळ करतात.

COPYRIGHTS म्हणजे हक्क.

एखाद्या पुस्तकाचे व तत्सम कलाकृतीचे अधिकृत/ कायदेशीर हक्क जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही म्हणू शकता कि तुमच्याकडे त्याचे Copyrights आहेत. (उदा.या ब्लॉगवर लिहिलेल्या सर्व लेखांचे copyrights माझ्याकडे आहेत.) इतर कुणी तुमच्या संमतीशिवाय ते वापरू शकत नाही. जर तसं कुणी केलं तर ते बेकायदेशीर असेल व त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.

COPY WRITING म्हणजे जाहिरातीसाठी लिहिला जाणारा मजकूर.

कुठल्याही स्वरूपाची जाहिरात तुम्ही वाचली, ऐकली वा पाहिली असेल तर त्यात जी माहिती असते ती माहिती लिहिणे म्हणजे Copy Writing.


 कॉपीरायटिंग आणि कंटेंट रायटिंग मध्ये फरक काय?


कॉपीरायटिंग म्हणजे थेट विक्रीच्या उद्देशाने लिहिलेला मजकूर. 
उदा. सर्व प्रकारच्या जाहिराती. पॅम्फ्लेट्स, ब्रॉशर्स, वर्तमानपत्रातल्या, मासिकातल्या, टी.व्ही. वरच्या, इंटरनेटवरच्या जाहिराती.

कंटेंट रायटिंग म्हणजे तुमच्या संभाव्य ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या, त्यांना शिक्षित करणाऱ्या, उपयुक्त माहिती पुरवणाऱ्या ब्लॉग पोस्ट्स, सोशल मीडिया पोस्ट्स, विविध प्रकारचे लेख, प्रेस रिलीज, श्वेतपत्रिका, माहितीपत्रके, इ. 



थोडक्यात:

थेट विक्री म्हणजे "कॉपीरायटिंग" आणि जागरूकता निर्माण करून मग विक्री म्हणजे "कंटेंट रायटिंग"

आपल्या उद्योगाचं मार्केटिंग कराताना आपल्याला या दोन्ही प्रकारांची वेळोवेळी गरज भासते. 
कारण प्रॉडक्ट कितीही चांगलं असलं तरी तुम्हाला जर तुमच्या ग्राहकाला त्याची उपयुक्तता पटवून देता आली नाही तर त्याचा काहीही  उपयोग नाही.

हे दोन्ही प्रकार तुम्हाला तुमची विक्री वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे दोन्हीचा तुमच्या मार्केटिंगमध्ये सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे.

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

कमी पैशात व घरातून करता येण्याजोगे बिझनेस जे उत्तम पैसा देतात

Marathi Business Tips Home Office

घरातून करण्यासारखा बिझनेस म्हटलं कि रस्त्यावरून जाताना आपल्याला आजूबाजूला दिसणारे बोर्ड आठवतात

"इथे साडीला फॉल व पिको करून मिळेल", 

"घरच्या गिरणीवर उपवासाचे पदार्थ व मसाले दळून मिळतील", 

"ब्युटी पार्लर चालू आहे", वगैरे वगैरे.

पापड-लोणची, सिझनल वस्तूंची विक्री, लहान मुलांच्या शिकवण्या व पाळणाघर, हे सगळे व्यवसाय आपण लहानपणापासून आजुबाजूला बघत आलेलो आहोत.

त्यात आता काही नवीन बिझनेसशी भर पडली आहे ज्यात गुंतवणूक कमी आहे आणि दर महिन्याला ठराविक रक्कम घरात येऊ शकते.

१) कन्सल्टन्सी  



 
तुम्हाला कदाचित आधीपासूनच माहिती असलेला हा पर्याय आहे. विमा एजंट, शेअर मार्केट सल्लागार पासून ते रीअल ईस्टेट एजंट पर्यंत कुठल्याही विषयातील सल्ला देण्याचं काम तुम्ही घरातून सुद्धा सुरू करू शकता.

समजा तुम्हाला यातलं  काहीही येत नसेल, तर तुम्ही शिकू शकता. आणि शिकण्याचीही ईच्छा नसेल तर आणखी एक उपाय म्हणजे ज्या व्यक्तीला या विषयातील ज्ञान आहे अशी व्यक्ती शोधून काढा, आणि, तुम्ही तुमच्या घरातून त्या व्यक्तीच्या मदतीने सल्ल्याचा व्यवसाय सुरू करू शकता. जागा तुमची वापरा, सल्ले ती व्यक्ती देईल. सल्ल्याच्या मिळालेल्या फी मधून दोघे पैसे वाटून घ्या.

असे खूप प्रोफेशनल लोक असतात कि त्यांना ऑफिस भाड्याने घेणं परवडत नाही आणि राहती जागा सुद्धा पुरेशी नसते. तेव्हा तुमची जागा जर मोठी असेल, ( किमान एक टेबल, एक कपाट, चार खूर्च्या बसतील एवढी) तर अशा क्वालिफाईड आणि गरजू लोकांना शोधून काढून तुम्ही त्यांना हि ऑफर द्या.

त्यांना बिना भाड्याची जागा मिळेल आणि तुम्हाला काहीही न करता त्यांच्या फी मधून थोडा शेअर मिळेल, दोघांचा फायदा होईल. समजा त्या व्यक्तीकडे ऑफिस असेल, वा घरी पण जागा असेल तरी तुम्ही ऑफर देऊन बघा. शनिवार-रविवार, आठवड्यातून दोन दिवस, वा असंच काहितरी ते तुमच्याकडे येऊन सल्ला देतील आणि इतर वेळी त्यांच्या ऑफिस मधून. असा अनेक प्रकारे विचार करून तुम्ही अनेक प्रकारच्या प्रोफेशनल लोकांना ऑफर देऊ शकता आणि घरबसल्या चार जास्तीचे पैसे कमावू शकता.

२) मॅरेज ब्युरो  



लग्न जमविण्याच्या बाबतीत एक अस्सल पुणेरी पाटी प्रसिद्ध आहे, "आम्ही फक्त लग्न 'जमवतो', ते 'टिकवणं' तुमच्या हातात आहे".

आजकाल जिकडे तिकडे आजूबाजूला लग्न जमविण्याची कार्यालयं सुरू होत आहेत. घरबसल्या करता येण्याजोगा व्यवसाय असल्याने तुम्ही देखील हे करू शकता.

या क्षेत्रातील काहिही महिती व अनुभव नसेल तर प्रस्थापित मॅरेज ब्यूरो मालकांना संपर्क करा. ते मार्गदर्शन करतील. वाटल्यास तुमच्या विभागतील त्यांची शाखा बना. 

३) पेट शॉप 



पेट शॉप म्हणजे पाळीव प्राण्यांची विक्री. आणि ती सुद्धा कायदेशीर पणे. जर तुम्ही वेगळी जागा घेऊन हा उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला जागेसाठी लायसन्स वगैरेची गरज भासेल.

पण तुमचं घर जर थोडं आडोश्याला असेल तर तुम्ही घरून लहान सहान प्राणी  (शेजार्‍या-पाजार्‍यांना त्रास न होता) विकू शकता.

उदा. फिश टँक साठी लागणारे शोभिवंत मासे, ससे, कुत्रा, मांजर, कासव, पक्षी, वगैरे. यातून देखील खूप मोठं उत्पन्न मिळू शकतं:
  • मांजर ५०००/- ते २५,०००/- रुपयांना मिळते.
  • कुत्र्याचं पिल्लू १०,०००/- ते १५,०००/- पासून ७०,०००/- ते ८०,०००/- रुपयांना मिळतं. कुत्रा-मांजर यांसाठी मोठी जागा लागेल.
  • ससा विकणार असाल तर त्यात दुहेरी फायदा आहे, तो म्हणजे मेंढीच्या लोकरीप्रमाणे सशाची फर सुद्धा विकली जाते.
  • समजा, तुमचं घर जर छोटं असेल, तर तुम्ही एखादा फिश टँक तुमच्या घरात ठेऊन त्यात मावतील एवढे शोभिवंत मासे ठेऊन ते देखील विकू शकता. मासे ५० रु. पासून ते ५०,०००/- पर्यंत विकले जातात.

४) बाल्कनीतील नर्सरी, बोन्साय व पोर्टेबल गार्डन  



 मोठी नर्सरी काढलीत तर मोठी जागा लागेल. पण घराचं अंगण, घरामागची जागा, गच्ची आणि बाल्कनी या जागेत सुद्धा थोड्या पण उपयुक्त वनस्पतींची लागवड करून त्या वनस्पतींची रोपे विकून तुम्ही पैसे कमावू शकता. उदा. फुलझाडे, फळझाडे, शोभिवंत झाडे, औषधी वनस्पती, सहजपणे पिकणार्‍या भाज्या, वगैरे.

तसेच, घरच्या घरी बोन्साय व पोर्टेबल गार्डन तयार करून ते देखील विकू शकता. बोन्साय व पोर्टेबल गार्डनचे क्लासेस असतात, तुमची ईच्छा असल्यास ते शिकून घेऊन घरातून त्याचा बिझनेस तुम्ही चालू करू शकता.

५) फ्रिलान्स डिलरशिप  



मागे एका लेखात आपण बघितलं कि फ्रँचाईझ घ्यायची म्हटलं कि किती गोष्टी नीट तपासून घ्यावा लागतात ते, त्याजर नीट तपासून घेतल्या नाहीत तर फसवणूक होण्याची शक्यता असते. पण फ्रीलान्स डिलरशिप मध्ये असं नसतं. 'फ्रीलान्स' म्हणजे स्वतंत्ररीत्या काम करणे.

या प्रकारच्या डिलरशिपमध्ये तुमच्यावर कसलीही बंधनं नसतात, मासिक फी नसते, प्रोसेसिंग फी नसते, ठराविक इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नसते.  नियम व अटी शिथिल व लवचिक असतात. वस्तूंची व्हरायटी मोठी असते, कपडे, खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, वगैरे वगैरे काहीही तुम्ही घरबसल्या विकू शकता.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कसलीही किचकट कागदपत्रं, करारनामे व लायसन्स सादर करावं लागत नाही, तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमचा बिझनेस चालू करू शकता.

ठराविक कालावधी नंतर हवं तेव्हा वस्तू परत करू शकता आणि गुंतवेलेले पैसे परत घेऊ शकता.

कसलाही आर्थिक धोका नाही. एकदा तुम्ही नेहमीचे डीलर झालात कि पुष्कळ माल क्रेडीटवर सुद्धा मिळतो. त्यामुळे अशा प्रकारच्या मुक्त व स्वतंत्र डिलरशिपमधून तुम्ही उत्तम प्रकारे पैसे कमावू शकता.

रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

फ्रँचाईझ विकत घेताय? इथे एक नजर टाका म्हणजे नंतर पश्चाताप करावा लागणार नाही.


Franchising Tips for Marathi Business
जेव्हा एखादी कंपनी दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला वा कंपनीला काही ठराविक काळासाठी तिच्या वस्तू वा सेवा विकून नफा कमावण्याचे विशेष अधिकार देते, तेव्हा त्याला 'फ्रँचायझिंग' असं म्हणतात.

यात जी कंपनी ते विशेष अधिकार देते तिला 'फ्रँचायझर' आणि जी कंपनी ते अधिकार स्वीकारते तिला 'फ्रँचाईझी' असं म्हणतात. आणि हि जी गुंतवणूक आहे तिला 'फ्रँचाईझ' असं म्हणतात. 

यामध्ये 'फ्रँचाईझी' जी असते ती 'फ्रँचायझर'च्या प्रसिद्धिचा व नावलौकीकाचा वापर करून त्यांच्या वस्तू विकून नफा कमावते. आणि त्या नफ्यातून काही रक्कम फी म्हणून 'फ्रँचायझर'ला देते.

उदा. मॅकडॉनोल्ड हि एक कंपनी आहे, आणि जगभरात त्यांनी विविध व्यक्तींना वा कंपनींना फ्रँचाईझ दिलेल्या आहेत. मॅकडोनाल्ड त्यांच्या कंपनीची जाहिरात जिथे जिथे करते तिथले आ़जूबाजूचे त्यांचे ग्राहक जवळच्या फ्रँचाईझमध्ये जाऊन त्यांचे खाद्यपदार्थ खरेदी करतात.





अशाप्रकारे तुम्ही आधीपासूनच 'नाव' असलेल्या, व नफ्यात चालणार्‍या फ्रँचायझर कंपनीची फ्रँचाईझ घेऊन बिझनेस सुरू करू शकता. म्हणजे 'मी एफ.डी. केली', 'मी विमा पॉलीसी घेतली' तसं, 'मी फ्रँचाईझ घेतली' असं तुम्ही म्हणू शकता. मी 'फ्रँचाईझी' घेतली म्हणणं चुकीचं आहे.

तुम्ही 'फ्रँचाईझ' घेऊन 'फ्रँचाईझी' होता. हे अगदी नीट लक्षात ठेवा.  फ्रँचाईझ जवळपास प्रत्येक बिझनेसच्या असतात. तुम्ही तुमच्या आवडीने त्याची निवड करू शकता.  नुसतंच मोठमोठ्या जाहिराती बघून एखाद्या कंपनीची फ्रँचाईझ घेऊन नंतर नुकसानीत जाणारे अनेकजण असतात.

तुमची अवस्था त्यांच्यासारखी होऊ नये म्हणून फ्रँचाईझ घेण्याआधी काय काय तपासून घ्यावं ते आपण पाहू :-



१)  त्या फ्रँचाईजरच्या वस्तूला वा सेवेला बाजारात मागणी आहे का ? 

मागणी असेल तर ती तात्पुरती आहे कि भविष्यात वाढू शकते?
स्पर्धक कोण कोण आहेत? 
साधारणपणे किती पैशात ती फ्रॅंचाईझ चालू होऊ शकते हे बघा, म्हणजे आणखी किती लोक त्यात स्पर्धक म्हणून उतरू शकतात याचा अंदाज बांधता येईल.



२) वस्तू आणि सेवेचा दर्जा कसा आहे?  

स्पर्धकांच्या वस्तूचा दर्जा आणि तुमच्या फ्रँचायझरच्या वस्तूंचा दर्जा यात किती फरक आहे?

तुलनात्मकदृष्ट्या कुणाचा दर्जा जास्त चांगला आहे ?

त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरची अपेक्षा काय आहे?

तुमच्या एरियातून तुम्ही यशस्वीपणे त्या वस्तू वा सेवा विकू शकाल याची तुम्हाला खात्री वाटते का?

नुसतचं फ्रँचायझ प्रॉफिटेबल असून उपयोग नाही, ती चालवायला तसं प्राईम लोकेशन पाहिजे, तशी मोक्याची जागा आहे का तुमच्याकडे ?



३) फ्रँचायझर किती जुना आहे? 

 त्याचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्याची रेप्युटेशन कशी आहे मार्केटमध्ये?
आधीच्या 'फ्रँचायझी' त्याच्याबरोबर काम करून फायद्यात आहेत का? 
त्यांचा काय अनुभव आहे?

४) तुमच्यामध्ये आणि फ्रँचायझर मध्ये 'फ्रँचाईझ करार' होणार आहे का? 

असल्यास त्याचे नियम व अटी हे एका त्या विषयातील जाणत्या कयदेशीर सल्लागाराकडून तपासून घ्या. फ्रँचाईझ सरेंडर कधी आणि कशी करायची, त्याचे नियम, अटी व बंधनं काय काय आहेत ?



५) फ्रँचायझर आर्थिकदृष्ट्या समर्थ आहे का? त्यांची कंपनी कर्जबाजारी तर नाही ना?  

तुम्ही पैसे भरून फ्रँचाईझ घेतल्यावर काही महिन्यांनी वा वर्षांनी लगेच ती कंपनी बंद होण्याची चिन्हं तर दिसत नाहीयेत ना?

त्यांच्यावर फ्रँचाईझच्या बाबतीत काही कायदेशीर केसेस व बंधनं वगैरे नाहीत ना ?

६) 'फ्रँचायझी फि' किती आहे आणि ती कशी भरायची आहे?  


ती भरायला उशीर झाल्यास दंड आहे का ? असल्यास किती टक्के ?

 फीच्या बदल्यात काय काय सोई-सुविधा तुम्हाला मिळणार आहेत?

फ्रँचाईझ चालवताना कुठल्या कुठल्या गोष्टीत ते तुम्हाला सहकार्य करणार आहेत?

स्टाफ ठेवणं बंधनकारक असेल तर त्यांचा गणवेश कोण देणार, त्यांना जॉब ट्रेनिंग देण्याची जवाबदारी कोणाची ?

मार्केटींग व जाहिरातींचं मटेरियल महिन्यातून किती वेळा आणि कसं पाठवणार ?



७) फ्रँचायझरचे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत?  


कुठे कुठे आणि कसकसा बिझनेस वाढवणार आहे?

तुमच्याच एरीयात वा जवळपास इतर कुणाला दुसरी फ्रँचाईझ तर ते देणार नाहीयेत ना?

नवीन प्रॉडक्ट्स कुठले लाँच करणार आहेत?

त्यांच्या स्वतःच्या फायद्याबरोबर फ्रँचायझीच्या फायद्याचे निर्णय ते घेतात का? वेळोवेळी होणार्‍या त्यांच्या फ्रँचायझींच्या सभा व सेमिनार्सना उपस्थित रहात जा म्हणजे याविषयी अद्ययावत माहिती मिळत जाईल.

आता वर दिलेली प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची गरज नाही, कारण बिझनेस मॉडेल नुसार त्यात फरक पडतो. त्यामुळे जसं बिझनेस मॉडेल असेल तशा प्रकारचे त्याला अनुकूल असे प्रश्नं त्या फ्रँचायझरला विचारा व व्यवस्थित माहिती करून घ्या.

इथे सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे कि फ्रँचाईझच्या बिझनेस मध्ये उतरणारच आहात तर डोळसपणे निर्णय घ्या. तुमच्या नवखेपणाचा कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून या विषयात तुम्हाला ज्ञानी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 

या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे?

शनिवार, २६ सप्टेंबर, २०१५

अमॅझॉन आणि फ्लिपकार्ट सारखी ई-कॉमर्स कंपनी सूरू करायचीय? त्याआधी हे वाचा


Starting ecommerce Website Marathi Business Tips
नुकतंच फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत फ्लिपकार्टचे मालक-चालक 'बन्सल बंधू' यांचा समावेश झाला. ते देखील पहिल्या ५०० श्रीमंतांपैकी थेट ५८ व्या क्रमांकावर.

म्हणजे तुम्हाला जर भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत जायचं असेल तर पेट्रोकेमिकल, तेलाच्या खाणी, मोबाईल कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्चर, वगैरे सारख्या मोठ्या क्षेत्रातच असलं पाहिजे असं नाही.

आता ई-कॉमर्स कंपनीच्या भरवशावर सुद्धा तुम्ही सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पोहोचू शकता हे सिद्ध झालं.





ई-कॉमर्स कंपन्यांच्या आणि त्यांच्या मालकांच्या यशोगाथा ऐकून-वाचून तुम्हालासुद्धा एखादी ई-कॉमर्स साईट सुरू करायची सुरसुरी आली असेल तर घाईघाईने निर्णय घेऊन अंधारात बाण मारू नका.

तशी साईट सुरू करताना वा करण्यापूर्वी काय काय बघितलं पाहिजे, हे आधी माहित करून घ्या आणि मग पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरा. 

साईट सुरु करताना बघायचे असे बरेचसे मुद्दे आहेत, पण ते प्रत्येक कॅटेगरी नुसार वेगवेगळे असतात. त्यापैकी जे कॉमन आहेत, ते आपण इथे पाहू:-

बिझनेस प्लॅन



सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित आणि सविस्तर असलेला बिझनेस प्लॅन. तुम्हाला नक्की काय करायचयं, कुठे करायचंय,  त्यासाठी कशाची गरज आहे, किती गरज आहे, आणि ते कसं करायचंय ह्या गोष्टी तिथे मांडून ठेवल्या कि नंतर गोंधळ उडणार नाही.

ई-कॉमर्स मध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक भूमिका कराव्या लागतात, तेव्हा लहानातला लहान मुद्दा सुद्धा तुमच्या हातून सुटता कामा नये, म्हणून बिझनेस प्लॅन तयार करून ठेवा.

त्यामध्ये तुम्हाला लागणारा पैसा, अनपेक्षितपणे येणारा खर्च, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अपेक्षित उत्पन्न, वगैरे गोष्टींचा समावेश करा.

प्रॉडक्ट कॅटेगरी   



कुठले प्रॉडक्ट्स तुम्ही विकणार आहात तुमच्या ई-कॉमर्स साईटवर ?

 "सगळे", हे जर का तुमचं उत्तर असेल तर तुम्हाला थोड्या अभ्यासाची गरज आहे.

सुरुवातीपासूनच सगळे प्रॉडक्ट्स घेतलेत तर त्याची व्यवस्था पाहणे अवघड होऊन बसेल. ई-कॉमर्स मधल्या मोठ्या कंपन्या सुद्धा आधी फक्त काही निवडक प्रॉडक्ट्स विकत होत्या.

फ्लिपकार्ट वर आधी फक्त पुस्तकं मिळत होती, नंतर हळूहळू त्यांनी इतर प्रॉडक्ट्स विकायला सुरूवात केली.  स्नॅपडील, व इतर तत्सम कंपन्याचंदेखील तेच आहे.

पेटीएम, सुद्धा आधी फक्त 'ऑनलाईन पेमेंट' करण्यासाठी सोयीच्या अशा "मध्यस्था" च्या रुपात सुरू झालेली कंपनी होती, आणि आता त्यांनी ई-कॉमर्सचं मॉडेल त्यांनी सुरू केलं आहे.

तेव्हा आधी या गोष्टीवर योग्य तेवढा वेळ द्या. प्रॉडक्ट्स निश्चित करा आणि मग पुढे चला.

टारगेट कस्टमर 

प्रॉडक्ट्स निश्चित केल्यावर ते विकत घेणारा संभाव्य ग्राहक कोण आहे हे ठरवा. नुसतं नाही. कागदोपत्री त्याची नोंद करा.

'डेमोग्राफिक्स' (म्हणजे तुमच्या संभाव्य ग्राहकांची अंदाजे माहिती, त्यांचं वय, उत्पन्न, लिंग, व्यवसाय, राहणीमान, वगैरे) हा बिझनेसमधला महत्त्वाचा घटक आहे आणि तो न कंटाळता केलाच पाहिजे. 

लॉजिस्टीक्स 




तुमच्या साईटवरून तुमच्या ग्राहकांनी ऑर्डर केली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार कशी ? त्याची व्यवस्था आधी लावून ठेवली पाहिजे.

कुठल्या कुरीयर कंपन्या ई-कॉमर्स कंपन्यांना विशेष दरात सेवा देतात, तुमचं ऑफिस जिथे असणार आहे, तिथे आसपास अशा कंपन्या आहेत का?, नसल्यास त्या जिथे कुठे आहेत तिथून तुमच्या गोडाऊनपर्यंत येऊन तुमचा माल घेऊन जाणार आहेत का ? कि तुम्हाला नेऊन द्यावं लागेल.

हे सगळं व्यवस्थित पडताळून बघा. त्यांचे दर नीट बघा, छुपे खर्च नाहीत ना याची खात्री करा. परतीच्या ऑर्डर्स, माल बदलण्याच्या, वा रद्द झालेल्या ऑर्डर्स, याबाबत त्यांच्या पॉलीसी काय आहेत, वाहतूकीत झालेल्या मालाच्या नुकसानीची जवाबदारी कुणाची, मालाला इन्सुरन्सचं कव्हर आहे का, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं तपासा.

कंटेट 

 

मालाचे फोटो हे सर्वोत्तम असायला हवेत.

 इथे प्रत्यक्ष माल बघायला मिळणार नाही म्हणजे फोटो बघूनच तुमचे ग्राहक ऑर्डर देणार, तेव्हा त्या फोटोंचं डिझाईन हे प्रोफेशनल असायला हवं. मोठ्या रिझोलूशन चे ठसठशीत आणि स्पष्ट दिसतील असे फोटोच साईट वर अपलोड करा.

ग्राहकांच्या मनात दर्जाविषयी शंका निर्माण होईल असे नकोत. वस्तूंविषयी आवश्यक तेवढी सगळी आणि खरी माहिती द्या. नुसते फोटो अपलोड करून भागणार नाही.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

 

तुमची साईट तुम्ही स्वतःच डेव्हलप करणार असाल तर उत्तमच. पण जर इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची (शॉपिफाय, मार्टजॅक,इ.) मदत घेणार असाल, तर त्याची चौकशी सखोलपणे करा. वरवरच्या फिचर्सना भूलून जाऊ नका. खासकरून सिक्युरिटी फिचर्स तपासा.

स्नॅपडील वर एका ग्राहकाने एकदा महागाचा 'आयफोन' ऑर्डर केला होता आणि त्याचा बदल्यात 'आयफोन' ऐवजी त्या माणसाला साबणाची वडी मिळाली होती.

असं तुमच्या ग्राहकांच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीची सुरक्षा बघा.

कॉम्पीटीटर्स  

तुमचे स्पर्धक नेमके कोण आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या, कमकुवत बाजू कोणत्या, कशाप्रकारे तुम्ही तुमची साईट प्रभावीपणे मार्केटला आणू शकता, आणि जास्तीचा मार्केट शेअर मिळवू शकता, याचा बारकाईने अभ्यास करा.

पैशाचे स्त्रोत 

 पैसे नक्की कसे कमावणार?

स्वतः मॅन्युफॅक्चररकडून वस्तू आणून त्या स्टॉक करणार आणि त्या वस्तूंवर तुमचं प्रॉफिट मार्जिन लावून विकणार कि फक्त मध्यस्थाची भूमिका बजावणार आणि त्याचं कमिशन घेणार. हे आधी ठरवा.

पेमंट गेटवे 

 

स्वतः साईट डेव्हलप केली तर याचा खर्च जास्त येऊ शकतो. प्लॅटफॉर्म वापरला तर त्यांच्या मुख्य फि मध्येच याची पण फि समाविष्ट असते. तरी एकदा विचारून खात्री करून घ्या.

रद्द होणार्‍या ट्रांझॅक्शनची फी, ऑनलाईन ट्रान्स्फर फी, तांत्रिक चुकांमुळे बसणारा दंड, हे सगळं आधीच बोलून घ्या. एकदा साईट चालू झाली कि नंतर या गोष्टींवर वाद घालून उपयोग होणार नाही, त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.

लोकाचा पैसा असल्यामुळे काळजी घ्या, थोडंसं दुर्लक्ष आणि एक चुकीचा निर्णय तुम्हाला कर्जबाजारी करू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन खरेदी बाबत पाश्चिमात्य देशांइतकी विश्वासार्हता अद्याप आलेली नाही.  

तेव्हा शक्यतो सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त वस्तूंना 'कॅश-ऑन-डिलीवरी'चा पर्याय देण्याचा प्रयत्न करा.

टेस्टींग

साईटचं काम पूर्ण झाल्यावर ती अमुक तारखेलाच चालू झाली पाहिजे म्हणून घाईघाईने सुरू करू नका. चार-चारदा टेस्टींग करून बघा. मित्र-आप्तेष्टांना त्यावरून काहीतरी ऑर्डर करायला सांगा.

सगळी प्रक्रीया सुरळीतपणे होतेय कि नाही बघा, आणि तशी खात्री झाली कि मगच साईट लाँच करा.

SEO

 

सर्च इन्जिन ऑप्टीमायझेशन कडे दुर्लक्ष करु नका. प्रोफेशनल माणसाकडून ते करून घ्या. ई-कॉमर्सचं मार्केट तंग असल्याकारणाने SEO सारखे पर्याय तारणहार असल्यासारखे उपयोगी पडतात. 'कॉम्पिटीटीव अ‍ॅडवांटेज'साठी त्यांचा उपयोग करून घ्या.

ई-कॉमर्स मध्ये रोज नव्याने बदल होत आहेत, त्यामुळे स्वतःला त्याबाबतीत अद्ययावत ठेवत चला. गाफील राहिलात तर मागे पडाल. कारण जगभरात १ लाखा पेक्षा जास्त ई-कॉमर्स वेबसाईट्स आहेत, आणि हि फक्त यशस्वीपणे नफा कमावणार्‍या साईट्सची संख्या आहे.

नवीन असलेल्या आणि, जुन्या पण स्ट्रगल करत असलेल्यांची तर इथे मोजदादच नको करायला. तेव्हा ई-कॉमर्स मध्ये उतरणार असाल तर जरूर उतरा, प्रचंड पोटेंशियल असलेलं मार्केट आहे ते, पण प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल एवढं लक्षात असू द्या.

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

पुढची 'क्लायंट मिटींग' यशस्वी करायची असेल तर या 'सेल्स टिप्स' वाचाच

Sales Tips in Marathi Business
तुमच्या बिझनेसची जाहिरात बघून तुमच्या एका संभाव्य ग्राहकाने समजा तुम्हाला फोन केला, आणि तुमच्या प्रॉडक्ट विषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला भेटायला बोलावलं, तर तुम्ही त्यांच्याशी कशाप्रकारे बोलता?

तुमच्या बाबतीत असं किती वेळा घडलंय कि, तुम्ही भेटायला गेलात, सगळी माहिती देऊन झाली आणि लगेचच समोरच्या माणसाने तुमची वस्तू विकत घ्यायला नकार दिला?

तुम्ही स्वतः जात नसाल, आणि तुमच्याकडे कामाला असलेल्या सेल्समनला पाठवत असाल,  तर तो किती वेळा नकार ऐकून परत आला आहे?

तुमच्या 'सेल्स् प्रेझेंटेशन'ला तुमच्या संभाव्य ग्राहकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा आणि तुमचं प्रॉडक्ट व सेवा विकली जावी, यासाठी या काही बेसिक पण महत्त्वपूर्ण अशा टीप्स् :-




१) तुम्ही काय सांगता हे महत्त्वाचं नाही; तुमच्या ग्राहकाला काय पटतं ते महत्त्वाचं आहे.

'सेल्स प्रेझेंटेशन' दिल्यावर तुम्हाला वाटू शकतं कि तुम्ही 'द बेस्ट' असं प्रेझेंटेशन दिलंय, सगळे मुद्दे कवर केलेत आणि तुमचं काम झालंय. पण  तुमच्या ग्राहकाला जर तुमचं म्हणणं नीट समजलेलंच नसेल, तर केलेल्या आटापिट्याचा काय उपयोग ? असं एकतर्फी असलेलं कोरडं प्रेझेंटेशन कधी देऊ नये.

ग्राहकाशी संवाद साधण्याला थोडा वेळ द्या. त्यांना प्रश्नं विचारा, त्यांच्या अपेक्षा व गरजा जाणून घ्या. शक्य आहे कि, कधी कधी त्यांना पण माहिती नसतं कि नक्की त्यांना कशाची गरज आहे, तेव्हा अशा वेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे तुमचं काम आहे. तुमचं म्हणणं त्यांना कळणं व पटणं हे दोन्ही गरजेचं आहे. 




२) 'सेल्स कॉल' ला जाताना कधीही पूर्वतयारीशिवाय जाऊ नका.

प्रवासाला निघाल्यावर कुठे जायचंय हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर तिथे तुम्ही पोहोचणार कसे? प्रेझेंटेशनमधला सामान्यपणे विसरला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, 'क्लोज'. त्याचा आवश्यक तेवढा सराव करा.

व्यवस्थित आखणी करून नेमकं काय बोलून झाल्यावर, किती वेळाने नेमक्या कुठल्या जागी 'क्लोज' करायचा, हे आधीच ठरवून ठेवा. याचा अर्थ एकच पठडीबाज प्रकार सारखा सारखा वापरायचा, असं नाही. 

वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची विक्री कौशल्य वापरायची(गरज वाटली तरच). ग्राहक काय बोलतो, कसा प्रतिसाद देतो हे बघून योग्य ती अ‍ॅक्शन घ्यायची.



३) संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी रोज वा आठवड्यातून काही तास असा वेळ राखून ठेवा आणि तो कटाक्षाने त्याच कामासाठी वापरा.

संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधणं सोडून बाकीचे सगळे प्रकार करण्यातच बरेचजण धन्यता मानतात. तुम्ही जर ते तुमच्या दिनक्रमानुसार नीट वेळापत्रकावर लावून ठेवलं नाहीत तर तुम्ही देखील इतरांप्रमाणे सोईस्कररीत्या दुर्लक्ष कराल. ज्यामुळे तुमचंच नुकसान होईल. तेव्हा असं होऊ देऊ नका.



४) स्वतःच्या विक्री कौशल्यावर आणि तुम्ही जे तुमच्या ग्राहकांना विकणार आहात त्या वस्तू/सेवेवर विश्वास ठेवा.

तुम्ही जे विकत आहात, त्यावर जर तुमचाच विश्वास नसेल तर ज्याला तुम्ही ते विकता आहात तो तरी त्यावर विश्वास ठेऊन तुमच्याकडून ते कसं काय विकत घेईल? याचा नीट विचार करा.

हेच कारण आहे कि बोलण्याची कला साध्य असणारे, आत्मविश्वास असणारे विक्रेते इतरांपेक्षा जास्त यशस्वी असतात. त्यांच्यापैकी एक होण्याचा प्रयत्न करा.



५) काहीही झालं तरी ठरलेल्या भेटीला हजर रहा आणि तेसुद्धा वेळेवर.

केवळ वेळ न पाळल्यामुळे अपयशी झालेले बरेचसे विक्रेते आहेत. इतकी साधी आणि लहानपणापासून शिकत आलेली गोष्ट सुद्धा लोक पाळू शकत नाहीत, हे निराशाजनक आहे.

म्हणूनच 'नोकरी देणे' च्या सगळ्या जाहिरातींमध्ये सेल्समेनच्या नोकरीसाठी सगळ्यात जास्त जाहिराती असतात.

शिस्तबद्धता हि जशी प्रत्येक क्षेत्रात लागते तशीच 'सेल्स' सारख्या सामान्य व कमी महत्त्वाच्या वाटणार्‍या पण प्रत्यक्षात सगळ्यात जास्त महत्त्व असणार्‍या क्षेत्रात सुद्धा लागते, हे लक्षात असू द्या.

फेसबुकवर वेगळे बिझनेस पेज असण्याचे ७ फायदे

Facebook Marketing For Marathi Business

बरेचसे स्वतंत्र व्यावसायिक व उद्योजक आपल्या फेसबुक प्रोफाईल वरूनच त्यांच्या बिझनेसचं मार्केटींग  आणि प्रमोशन करत असतात.  हेच जर त्यांनी फेसबुक वर वेगळं बिझनेस पेज केलं आणि प्रोफाईल हे  फक्त खाजगी गोष्टीं करता वापरलं, तर त्याचे काय काय फायदे आहेत, ते इथे पाहूया.


१) तुमचे ग्राहक तुमच्या बिझनेस पेजला 'लाईक' करतील, त्यामुळे भविष्यातील सगळ्या पोस्टस् अचूकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे तुम्ही फेसबुक प्रोफाईल वेगळे ठेऊ शकाल, आणि मित्र-नातेवाईकांबरोबरचा तिथला संवाद खाजगी ठेऊ शकाल.

२) तुम्ही तुमच्या उद्योगाशी संबंधित फोटो, व्हिडिओ, लेख, लिंक्स, चर्चा, बातम्या, खास ऑफर्स, वगैरे सगळ्या प्रकारची व्यावसायिक माहिती एकाच जागेवरून प्रसारीत करू शकता. प्रॉडक्ट आणि सेवेविषयी सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यावर तुमच्या जुन्या ग्राहकांबरोबरच नवे ग्राहक सुद्धा आकर्षित होतात.



३) जेव्हा तुम्हाला एखादा नवीन प्रॉडक्ट वा नवीन सेवा सुरू करायची असेल तेव्हा तुम्ही त्याची घोषणा आणि त्याचं लाँचिंग तुमच्या बिझनेस पेजवरून करू शकता. ते थेट तुमच्या ग्राहकांच्या टाईम लाईन वर अवतरत असल्यामुळे त्यांना त्याबाबत त्वरीत माहिती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही कधीही तुमच्या ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचू शकता.

४) तुम्ही तुमच्या ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क साधू शकता. तुमच्या सेवेविषयी त्यांची मतं, विचार जाणून घेऊ शकता. एखादे नवीन प्रॉडक्ट मार्केटला आणण्यापूर्वी आधीपासूनच तुमचं प्रॉडक्ट वापरून संतुष्ट असणार्‍या ग्राहकांना तुम्ही त्यांचा अभिप्राय व सूचना विचारू शकता. हि फार मोठी गोष्ट आहे. यातून विश्वासार्हता जपली जाते. चांगले संबंध जपले जातात. व तुमची पारदर्शकता दिसून येते.

५) स्वतंत्र बिझनेस पेज असल्यामुळे तुम्हाला जगाच्या पाठीवर असलेला तुमचा कुणीही ग्राहक सहज जोडला जाऊ शकतो. त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारची 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवावी लागत नाही. शिवाय मित्र यादी ला जशी मर्यादा आहे तशी बिझनेस पेजला मर्यादा नाही. तुम्ही कितीही ग्राहकांबरोबर जोडले जाऊ शकता.




६) सर्च इंजिन्सना सुद्धा फेसबुक खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसशी संबंधित कुठल्याही प्रकारची माहिती तुमच्या पेजवर शेअर करता तेव्हा ती सर्च इंजिन्स मध्ये लगेचच मिसळली जाते. त्यामुळे तुमच्या बिझनेस पेजला जास्तीत जास्त लाईक्स मिळू शकतात. आणि जर तुमच्याकडे वेबसाईट वा ब्लॉग असेल तर तुम्ही फेसबुक पेजवर आलेल्या तुमच्या ग्राहकांना तिकडे वळवू शकता.

७) तुम्ही तुमचं फेसबुक बिझनेस पेज आणि वेबसाईट हे दोन्ही मिसळू शकता. म्हणजे फेसबुक पेजचा 'लाईक बॉक्स' तुमच्या वेबसाईट व ब्लॉग वर ठेऊ शकता, ज्यायोगे वेबसाईट व ब्लॉग वर भेट येणारे लोक नुसतेच भेट देऊन निघून न जाता तुमच्या फेसबुक पेजला लाईक करतील, व भविष्यातील पुढच्या पोस्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील.



अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या उद्योगाच्या वाढीसाठी फेसबुक बिझनेस पेजचा वापर करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे "प्रायवसी". घरगुती फोटो, घरगुती कार्यक्रम, खाजगी गप्पा हे तुम्ही तुमच्या पर्सनल प्रोफाईल वर ठेऊन, बिझनेस पेजचा वापर अधिक प्रभावाने प्रोफेशनली करू शकता.

त्यामुळे तुमच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असणार्‍या लोकांना तुमच्या बिझनेस पोस्ट्सचा त्रास होणार नाही, आणि तुम्हाला न सांगता ते तुम्हाला "मित्रत्व ठेवा पण अनफोलो" करणार नाहीत. तेव्हा आजच फेसबुकवर वेगळे बिझनेस पेज तयार करा.

गुंतवणूकीबद्दल जाणकारांचे बोल जे तुमचा दृष्टिकोन बदलून टाकतील

Marathi Business Tips on Investment

गुंतवणूक म्हटलं कि मनात सर्वात आधी येणारे शब्द म्हणजे: जोखीम, नफा आणि नुकसान. पैशाचे व्यवहार कळायला लागल्यापासून असे काही  किस्से आपण एकलेले असतात, कि सहज जरी कुणी 'अरे, एक चांगली स्कीम आहे, करतो का इन्व्हेस्ट?' असं विचारलं तरी बर्‍याच जणांना धडकी भरते.

अशा वेळी ते लोक लगेच त्यांना माहित असलेल्यांपैकी 'कुणीतरी कसा डुबला, कर्जबाजारी झाला' या पठडीतले किस्से सांगून टाकतात, आणि 'म्हणून सांगतो नको रे बाबा रे ते. मोह फार वाईट.' इथे येऊन विषय संपवतात.



आपली ईच्छा असो वा नसो, अवतीभवती चालू असणार्‍या असल्या संभाषणांचा आपल्यावर कळत नकळतपणे प्रभाव पडत असतो. आणि त्यांना बळी पडून आपण आपले गुंतवणूकीसंदर्भातले निर्णय घेण्याची शक्यता बळावते.

इथून पुढे असं होऊ नये, चूक काय, बरोबर काय ते कळावं, याची सुरूवात म्हणून इथे काही जाणकार व अभ्यासू गुंतवणूकादारांचे विचार देत आहे. वेगवेगळ्या संदर्भात या विचारांचा अभ्यास केल्यास त्याचा  फायदा होईल.


"ज्ञानात केलेली गुंतवणूक सगळ्यात चांगलं व्याज देते" - बेंजामिन फ्रँकलिन

"शेअर मार्केट अशा लोकांनी भरलेलं आहे कि ज्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत माहिती आहे, पण कशाचंही मूल्य माहिती नाही."- फिलिप फिशर

"गुंतवणूकीमध्ये जे सोयीचं असतं ते क्वचितच फायद्याचं असतं"- रॉबर्ट आर्नोट

"अधून मधून एखाद्या वेळी, मार्केट असा काही मूर्खपणा करतं, कि ज्यामुळे तुमचा जीव वरखाली होतो"- जिम क्रॅमर



"वैयक्तिक गुंतवणूकदाराने कायम गुंतवणूकदारासारखेच वागले पाहिजे, भविष्यकारासारखे नाही"- बेन ग्रॅहम

"तुम्ही किती पैसे मिळवता याला तितकंसं महत्त्व नाही, पण तुम्ही किती पैसे टिकवता, ते तुमच्यासाठी कसे उपयोगी पडतात, आणि किती पिढ्यांपर्यंत तुम्ही ते टिकवता हे महत्त्वाचं"- रॉबर्ट कियोसाकी

"काय तुमच्या मालकीचं आहे हे लक्षात असू द्या, आणि ते का तुमच्या मालकीचं आहे हे देखील "- पीटर लिंच
"गुंतवणूकीतील सर्वाधिक घातक चार शब्द म्हणजे:- 'यावेळी हे वेगळं आहे'"- सर जॉन टेंपल्टन

" वैविध्य फक्त तेव्हाच गरजेचं असतं जेव्हा गुंतवणूकदारांना समजत नाही कि ते काय करतायत"- वॉरन बफे
गुंतवणूकीचं जग हे कधी थंड कधी गरम असं असतं. पण डोकं ठिकाण्यावर ठेऊन, व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेतलेत तर दीर्घकालीन यश मिळण्याची शक्यता असते. तुम्हाला जर कधी शंका वाटायला लागली तर उपरोक्त जाणकार व अनुभवी व्यक्तींचे हे विचार अधूनमधून वाचत चला.