शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

फेसबुकवर वेगळे बिझनेस पेज असण्याचे ७ फायदे

Facebook Marketing For Marathi Business

बरेचसे स्वतंत्र व्यावसायिक व उद्योजक आपल्या फेसबुक प्रोफाईल वरूनच त्यांच्या बिझनेसचं मार्केटींग  आणि प्रमोशन करत असतात.  हेच जर त्यांनी फेसबुक वर वेगळं बिझनेस पेज केलं आणि प्रोफाईल हे  फक्त खाजगी गोष्टीं करता वापरलं, तर त्याचे काय काय फायदे आहेत, ते इथे पाहूया.


१) तुमचे ग्राहक तुमच्या बिझनेस पेजला 'लाईक' करतील, त्यामुळे भविष्यातील सगळ्या पोस्टस् अचूकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे तुम्ही फेसबुक प्रोफाईल वेगळे ठेऊ शकाल, आणि मित्र-नातेवाईकांबरोबरचा तिथला संवाद खाजगी ठेऊ शकाल.

२) तुम्ही तुमच्या उद्योगाशी संबंधित फोटो, व्हिडिओ, लेख, लिंक्स, चर्चा, बातम्या, खास ऑफर्स, वगैरे सगळ्या प्रकारची व्यावसायिक माहिती एकाच जागेवरून प्रसारीत करू शकता. प्रॉडक्ट आणि सेवेविषयी सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यावर तुमच्या जुन्या ग्राहकांबरोबरच नवे ग्राहक सुद्धा आकर्षित होतात.



३) जेव्हा तुम्हाला एखादा नवीन प्रॉडक्ट वा नवीन सेवा सुरू करायची असेल तेव्हा तुम्ही त्याची घोषणा आणि त्याचं लाँचिंग तुमच्या बिझनेस पेजवरून करू शकता. ते थेट तुमच्या ग्राहकांच्या टाईम लाईन वर अवतरत असल्यामुळे त्यांना त्याबाबत त्वरीत माहिती मिळेल. अशा प्रकारे तुम्ही कधीही तुमच्या ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचू शकता.

४) तुम्ही तुमच्या ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क साधू शकता. तुमच्या सेवेविषयी त्यांची मतं, विचार जाणून घेऊ शकता. एखादे नवीन प्रॉडक्ट मार्केटला आणण्यापूर्वी आधीपासूनच तुमचं प्रॉडक्ट वापरून संतुष्ट असणार्‍या ग्राहकांना तुम्ही त्यांचा अभिप्राय व सूचना विचारू शकता. हि फार मोठी गोष्ट आहे. यातून विश्वासार्हता जपली जाते. चांगले संबंध जपले जातात. व तुमची पारदर्शकता दिसून येते.

५) स्वतंत्र बिझनेस पेज असल्यामुळे तुम्हाला जगाच्या पाठीवर असलेला तुमचा कुणीही ग्राहक सहज जोडला जाऊ शकतो. त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारची 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवावी लागत नाही. शिवाय मित्र यादी ला जशी मर्यादा आहे तशी बिझनेस पेजला मर्यादा नाही. तुम्ही कितीही ग्राहकांबरोबर जोडले जाऊ शकता.




६) सर्च इंजिन्सना सुद्धा फेसबुक खूप आवडतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसशी संबंधित कुठल्याही प्रकारची माहिती तुमच्या पेजवर शेअर करता तेव्हा ती सर्च इंजिन्स मध्ये लगेचच मिसळली जाते. त्यामुळे तुमच्या बिझनेस पेजला जास्तीत जास्त लाईक्स मिळू शकतात. आणि जर तुमच्याकडे वेबसाईट वा ब्लॉग असेल तर तुम्ही फेसबुक पेजवर आलेल्या तुमच्या ग्राहकांना तिकडे वळवू शकता.

७) तुम्ही तुमचं फेसबुक बिझनेस पेज आणि वेबसाईट हे दोन्ही मिसळू शकता. म्हणजे फेसबुक पेजचा 'लाईक बॉक्स' तुमच्या वेबसाईट व ब्लॉग वर ठेऊ शकता, ज्यायोगे वेबसाईट व ब्लॉग वर भेट येणारे लोक नुसतेच भेट देऊन निघून न जाता तुमच्या फेसबुक पेजला लाईक करतील, व भविष्यातील पुढच्या पोस्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील.



अशा अनेक प्रकारे तुम्ही तुमच्या उद्योगाच्या वाढीसाठी फेसबुक बिझनेस पेजचा वापर करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे "प्रायवसी". घरगुती फोटो, घरगुती कार्यक्रम, खाजगी गप्पा हे तुम्ही तुमच्या पर्सनल प्रोफाईल वर ठेऊन, बिझनेस पेजचा वापर अधिक प्रभावाने प्रोफेशनली करू शकता.

त्यामुळे तुमच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असणार्‍या लोकांना तुमच्या बिझनेस पोस्ट्सचा त्रास होणार नाही, आणि तुम्हाला न सांगता ते तुम्हाला "मित्रत्व ठेवा पण अनफोलो" करणार नाहीत. तेव्हा आजच फेसबुकवर वेगळे बिझनेस पेज तयार करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा