नुकतंच फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत फ्लिपकार्टचे मालक-चालक 'बन्सल बंधू' यांचा समावेश झाला. ते देखील पहिल्या ५०० श्रीमंतांपैकी थेट ५८ व्या क्रमांकावर.
म्हणजे तुम्हाला जर भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत जायचं असेल तर पेट्रोकेमिकल, तेलाच्या खाणी, मोबाईल कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्चर, वगैरे सारख्या मोठ्या क्षेत्रातच असलं पाहिजे असं नाही.
आता ई-कॉमर्स कंपनीच्या भरवशावर सुद्धा तुम्ही सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पोहोचू शकता हे सिद्ध झालं.
ई-कॉमर्स कंपन्यांच्या आणि त्यांच्या मालकांच्या यशोगाथा ऐकून-वाचून तुम्हालासुद्धा एखादी ई-कॉमर्स साईट सुरू करायची सुरसुरी आली असेल तर घाईघाईने निर्णय घेऊन अंधारात बाण मारू नका.
तशी साईट सुरू करताना वा करण्यापूर्वी काय काय बघितलं पाहिजे, हे आधी माहित करून घ्या आणि मग पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरा.
साईट सुरु करताना बघायचे असे बरेचसे मुद्दे आहेत, पण ते प्रत्येक कॅटेगरी नुसार वेगवेगळे असतात. त्यापैकी जे कॉमन आहेत, ते आपण इथे पाहू:-
बिझनेस प्लॅन
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित आणि सविस्तर असलेला बिझनेस प्लॅन. तुम्हाला नक्की काय करायचयं, कुठे करायचंय, त्यासाठी कशाची गरज आहे, किती गरज आहे, आणि ते कसं करायचंय ह्या गोष्टी तिथे मांडून ठेवल्या कि नंतर गोंधळ उडणार नाही.
ई-कॉमर्स मध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक भूमिका कराव्या लागतात, तेव्हा लहानातला लहान मुद्दा सुद्धा तुमच्या हातून सुटता कामा नये, म्हणून बिझनेस प्लॅन तयार करून ठेवा.
त्यामध्ये तुम्हाला लागणारा पैसा, अनपेक्षितपणे येणारा खर्च, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अपेक्षित उत्पन्न, वगैरे गोष्टींचा समावेश करा.
प्रॉडक्ट कॅटेगरी
कुठले प्रॉडक्ट्स तुम्ही विकणार आहात तुमच्या ई-कॉमर्स साईटवर ?
"सगळे", हे जर का तुमचं उत्तर असेल तर तुम्हाला थोड्या अभ्यासाची गरज आहे.
सुरुवातीपासूनच सगळे प्रॉडक्ट्स घेतलेत तर त्याची व्यवस्था पाहणे अवघड होऊन बसेल. ई-कॉमर्स मधल्या मोठ्या कंपन्या सुद्धा आधी फक्त काही निवडक प्रॉडक्ट्स विकत होत्या.
फ्लिपकार्ट वर आधी फक्त पुस्तकं मिळत होती, नंतर हळूहळू त्यांनी इतर प्रॉडक्ट्स विकायला सुरूवात केली. स्नॅपडील, व इतर तत्सम कंपन्याचंदेखील तेच आहे.
पेटीएम, सुद्धा आधी फक्त 'ऑनलाईन पेमेंट' करण्यासाठी सोयीच्या अशा "मध्यस्था" च्या रुपात सुरू झालेली कंपनी होती, आणि आता त्यांनी ई-कॉमर्सचं मॉडेल त्यांनी सुरू केलं आहे.
तेव्हा आधी या गोष्टीवर योग्य तेवढा वेळ द्या. प्रॉडक्ट्स निश्चित करा आणि मग पुढे चला.
टारगेट कस्टमर
प्रॉडक्ट्स निश्चित केल्यावर ते विकत घेणारा संभाव्य ग्राहक कोण आहे हे ठरवा. नुसतं नाही. कागदोपत्री त्याची नोंद करा.'डेमोग्राफिक्स' (म्हणजे तुमच्या संभाव्य ग्राहकांची अंदाजे माहिती, त्यांचं वय, उत्पन्न, लिंग, व्यवसाय, राहणीमान, वगैरे) हा बिझनेसमधला महत्त्वाचा घटक आहे आणि तो न कंटाळता केलाच पाहिजे.
लॉजिस्टीक्स
तुमच्या साईटवरून तुमच्या ग्राहकांनी ऑर्डर केली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार कशी ? त्याची व्यवस्था आधी लावून ठेवली पाहिजे.
कुठल्या कुरीयर कंपन्या ई-कॉमर्स कंपन्यांना विशेष दरात सेवा देतात, तुमचं ऑफिस जिथे असणार आहे, तिथे आसपास अशा कंपन्या आहेत का?, नसल्यास त्या जिथे कुठे आहेत तिथून तुमच्या गोडाऊनपर्यंत येऊन तुमचा माल घेऊन जाणार आहेत का ? कि तुम्हाला नेऊन द्यावं लागेल.
हे सगळं व्यवस्थित पडताळून बघा. त्यांचे दर नीट बघा, छुपे खर्च नाहीत ना याची खात्री करा. परतीच्या ऑर्डर्स, माल बदलण्याच्या, वा रद्द झालेल्या ऑर्डर्स, याबाबत त्यांच्या पॉलीसी काय आहेत, वाहतूकीत झालेल्या मालाच्या नुकसानीची जवाबदारी कुणाची, मालाला इन्सुरन्सचं कव्हर आहे का, त्याचे नियम काय आहेत, हे सगळं तपासा.
कंटेट
मालाचे फोटो हे सर्वोत्तम असायला हवेत.
इथे प्रत्यक्ष माल बघायला मिळणार नाही म्हणजे फोटो बघूनच तुमचे ग्राहक ऑर्डर देणार, तेव्हा त्या फोटोंचं डिझाईन हे प्रोफेशनल असायला हवं. मोठ्या रिझोलूशन चे ठसठशीत आणि स्पष्ट दिसतील असे फोटोच साईट वर अपलोड करा.
ग्राहकांच्या मनात दर्जाविषयी शंका निर्माण होईल असे नकोत. वस्तूंविषयी आवश्यक तेवढी सगळी आणि खरी माहिती द्या. नुसते फोटो अपलोड करून भागणार नाही.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म
तुमची साईट तुम्ही स्वतःच डेव्हलप करणार असाल तर उत्तमच. पण जर इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची (शॉपिफाय, मार्टजॅक,इ.) मदत घेणार असाल, तर त्याची चौकशी सखोलपणे करा. वरवरच्या फिचर्सना भूलून जाऊ नका. खासकरून सिक्युरिटी फिचर्स तपासा.
स्नॅपडील वर एका ग्राहकाने एकदा महागाचा 'आयफोन' ऑर्डर केला होता आणि त्याचा बदल्यात 'आयफोन' ऐवजी त्या माणसाला साबणाची वडी मिळाली होती.
असं तुमच्या ग्राहकांच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीची सुरक्षा बघा.
कॉम्पीटीटर्स
तुमचे स्पर्धक नेमके कोण आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या, कमकुवत बाजू कोणत्या, कशाप्रकारे तुम्ही तुमची साईट प्रभावीपणे मार्केटला आणू शकता, आणि जास्तीचा मार्केट शेअर मिळवू शकता, याचा बारकाईने अभ्यास करा.पैशाचे स्त्रोत
पैसे नक्की कसे कमावणार?स्वतः मॅन्युफॅक्चररकडून वस्तू आणून त्या स्टॉक करणार आणि त्या वस्तूंवर तुमचं प्रॉफिट मार्जिन लावून विकणार कि फक्त मध्यस्थाची भूमिका बजावणार आणि त्याचं कमिशन घेणार. हे आधी ठरवा.
पेमंट गेटवे
स्वतः साईट डेव्हलप केली तर याचा खर्च जास्त येऊ शकतो. प्लॅटफॉर्म वापरला तर त्यांच्या मुख्य फि मध्येच याची पण फि समाविष्ट असते. तरी एकदा विचारून खात्री करून घ्या.
रद्द होणार्या ट्रांझॅक्शनची फी, ऑनलाईन ट्रान्स्फर फी, तांत्रिक चुकांमुळे बसणारा दंड, हे सगळं आधीच बोलून घ्या. एकदा साईट चालू झाली कि नंतर या गोष्टींवर वाद घालून उपयोग होणार नाही, त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.
लोकाचा पैसा असल्यामुळे काळजी घ्या, थोडंसं दुर्लक्ष आणि एक चुकीचा निर्णय तुम्हाला कर्जबाजारी करू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन खरेदी बाबत पाश्चिमात्य देशांइतकी विश्वासार्हता अद्याप आलेली नाही.
तेव्हा शक्यतो सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त वस्तूंना 'कॅश-ऑन-डिलीवरी'चा पर्याय देण्याचा प्रयत्न करा.
टेस्टींग
साईटचं काम पूर्ण झाल्यावर ती अमुक तारखेलाच चालू झाली पाहिजे म्हणून घाईघाईने सुरू करू नका. चार-चारदा टेस्टींग करून बघा. मित्र-आप्तेष्टांना त्यावरून काहीतरी ऑर्डर करायला सांगा.सगळी प्रक्रीया सुरळीतपणे होतेय कि नाही बघा, आणि तशी खात्री झाली कि मगच साईट लाँच करा.
SEO
सर्च इन्जिन ऑप्टीमायझेशन कडे दुर्लक्ष करु नका. प्रोफेशनल माणसाकडून ते करून घ्या. ई-कॉमर्सचं मार्केट तंग असल्याकारणाने SEO सारखे पर्याय तारणहार असल्यासारखे उपयोगी पडतात. 'कॉम्पिटीटीव अॅडवांटेज'साठी त्यांचा उपयोग करून घ्या.
ई-कॉमर्स मध्ये रोज नव्याने बदल होत आहेत, त्यामुळे स्वतःला त्याबाबतीत अद्ययावत ठेवत चला. गाफील राहिलात तर मागे पडाल. कारण जगभरात १ लाखा पेक्षा जास्त ई-कॉमर्स वेबसाईट्स आहेत, आणि हि फक्त यशस्वीपणे नफा कमावणार्या साईट्सची संख्या आहे.
नवीन असलेल्या आणि, जुन्या पण स्ट्रगल करत असलेल्यांची तर इथे मोजदादच नको करायला. तेव्हा ई-कॉमर्स मध्ये उतरणार असाल तर जरूर उतरा, प्रचंड पोटेंशियल असलेलं मार्केट आहे ते, पण प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल एवढं लक्षात असू द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा