शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

कमी पैशात व घरातून करता येण्याजोगे बिझनेस जे उत्तम पैसा देतात

Marathi Business Tips Home Office

घरातून करण्यासारखा बिझनेस म्हटलं कि रस्त्यावरून जाताना आपल्याला आजूबाजूला दिसणारे बोर्ड आठवतात

"इथे साडीला फॉल व पिको करून मिळेल", 

"घरच्या गिरणीवर उपवासाचे पदार्थ व मसाले दळून मिळतील", 

"ब्युटी पार्लर चालू आहे", वगैरे वगैरे.

पापड-लोणची, सिझनल वस्तूंची विक्री, लहान मुलांच्या शिकवण्या व पाळणाघर, हे सगळे व्यवसाय आपण लहानपणापासून आजुबाजूला बघत आलेलो आहोत.

त्यात आता काही नवीन बिझनेसशी भर पडली आहे ज्यात गुंतवणूक कमी आहे आणि दर महिन्याला ठराविक रक्कम घरात येऊ शकते.

१) कन्सल्टन्सी  



 
तुम्हाला कदाचित आधीपासूनच माहिती असलेला हा पर्याय आहे. विमा एजंट, शेअर मार्केट सल्लागार पासून ते रीअल ईस्टेट एजंट पर्यंत कुठल्याही विषयातील सल्ला देण्याचं काम तुम्ही घरातून सुद्धा सुरू करू शकता.

समजा तुम्हाला यातलं  काहीही येत नसेल, तर तुम्ही शिकू शकता. आणि शिकण्याचीही ईच्छा नसेल तर आणखी एक उपाय म्हणजे ज्या व्यक्तीला या विषयातील ज्ञान आहे अशी व्यक्ती शोधून काढा, आणि, तुम्ही तुमच्या घरातून त्या व्यक्तीच्या मदतीने सल्ल्याचा व्यवसाय सुरू करू शकता. जागा तुमची वापरा, सल्ले ती व्यक्ती देईल. सल्ल्याच्या मिळालेल्या फी मधून दोघे पैसे वाटून घ्या.

असे खूप प्रोफेशनल लोक असतात कि त्यांना ऑफिस भाड्याने घेणं परवडत नाही आणि राहती जागा सुद्धा पुरेशी नसते. तेव्हा तुमची जागा जर मोठी असेल, ( किमान एक टेबल, एक कपाट, चार खूर्च्या बसतील एवढी) तर अशा क्वालिफाईड आणि गरजू लोकांना शोधून काढून तुम्ही त्यांना हि ऑफर द्या.

त्यांना बिना भाड्याची जागा मिळेल आणि तुम्हाला काहीही न करता त्यांच्या फी मधून थोडा शेअर मिळेल, दोघांचा फायदा होईल. समजा त्या व्यक्तीकडे ऑफिस असेल, वा घरी पण जागा असेल तरी तुम्ही ऑफर देऊन बघा. शनिवार-रविवार, आठवड्यातून दोन दिवस, वा असंच काहितरी ते तुमच्याकडे येऊन सल्ला देतील आणि इतर वेळी त्यांच्या ऑफिस मधून. असा अनेक प्रकारे विचार करून तुम्ही अनेक प्रकारच्या प्रोफेशनल लोकांना ऑफर देऊ शकता आणि घरबसल्या चार जास्तीचे पैसे कमावू शकता.

२) मॅरेज ब्युरो  



लग्न जमविण्याच्या बाबतीत एक अस्सल पुणेरी पाटी प्रसिद्ध आहे, "आम्ही फक्त लग्न 'जमवतो', ते 'टिकवणं' तुमच्या हातात आहे".

आजकाल जिकडे तिकडे आजूबाजूला लग्न जमविण्याची कार्यालयं सुरू होत आहेत. घरबसल्या करता येण्याजोगा व्यवसाय असल्याने तुम्ही देखील हे करू शकता.

या क्षेत्रातील काहिही महिती व अनुभव नसेल तर प्रस्थापित मॅरेज ब्यूरो मालकांना संपर्क करा. ते मार्गदर्शन करतील. वाटल्यास तुमच्या विभागतील त्यांची शाखा बना. 

३) पेट शॉप 



पेट शॉप म्हणजे पाळीव प्राण्यांची विक्री. आणि ती सुद्धा कायदेशीर पणे. जर तुम्ही वेगळी जागा घेऊन हा उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला जागेसाठी लायसन्स वगैरेची गरज भासेल.

पण तुमचं घर जर थोडं आडोश्याला असेल तर तुम्ही घरून लहान सहान प्राणी  (शेजार्‍या-पाजार्‍यांना त्रास न होता) विकू शकता.

उदा. फिश टँक साठी लागणारे शोभिवंत मासे, ससे, कुत्रा, मांजर, कासव, पक्षी, वगैरे. यातून देखील खूप मोठं उत्पन्न मिळू शकतं:
  • मांजर ५०००/- ते २५,०००/- रुपयांना मिळते.
  • कुत्र्याचं पिल्लू १०,०००/- ते १५,०००/- पासून ७०,०००/- ते ८०,०००/- रुपयांना मिळतं. कुत्रा-मांजर यांसाठी मोठी जागा लागेल.
  • ससा विकणार असाल तर त्यात दुहेरी फायदा आहे, तो म्हणजे मेंढीच्या लोकरीप्रमाणे सशाची फर सुद्धा विकली जाते.
  • समजा, तुमचं घर जर छोटं असेल, तर तुम्ही एखादा फिश टँक तुमच्या घरात ठेऊन त्यात मावतील एवढे शोभिवंत मासे ठेऊन ते देखील विकू शकता. मासे ५० रु. पासून ते ५०,०००/- पर्यंत विकले जातात.

४) बाल्कनीतील नर्सरी, बोन्साय व पोर्टेबल गार्डन  



 मोठी नर्सरी काढलीत तर मोठी जागा लागेल. पण घराचं अंगण, घरामागची जागा, गच्ची आणि बाल्कनी या जागेत सुद्धा थोड्या पण उपयुक्त वनस्पतींची लागवड करून त्या वनस्पतींची रोपे विकून तुम्ही पैसे कमावू शकता. उदा. फुलझाडे, फळझाडे, शोभिवंत झाडे, औषधी वनस्पती, सहजपणे पिकणार्‍या भाज्या, वगैरे.

तसेच, घरच्या घरी बोन्साय व पोर्टेबल गार्डन तयार करून ते देखील विकू शकता. बोन्साय व पोर्टेबल गार्डनचे क्लासेस असतात, तुमची ईच्छा असल्यास ते शिकून घेऊन घरातून त्याचा बिझनेस तुम्ही चालू करू शकता.

५) फ्रिलान्स डिलरशिप  



मागे एका लेखात आपण बघितलं कि फ्रँचाईझ घ्यायची म्हटलं कि किती गोष्टी नीट तपासून घ्यावा लागतात ते, त्याजर नीट तपासून घेतल्या नाहीत तर फसवणूक होण्याची शक्यता असते. पण फ्रीलान्स डिलरशिप मध्ये असं नसतं. 'फ्रीलान्स' म्हणजे स्वतंत्ररीत्या काम करणे.

या प्रकारच्या डिलरशिपमध्ये तुमच्यावर कसलीही बंधनं नसतात, मासिक फी नसते, प्रोसेसिंग फी नसते, ठराविक इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नसते.  नियम व अटी शिथिल व लवचिक असतात. वस्तूंची व्हरायटी मोठी असते, कपडे, खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, वगैरे वगैरे काहीही तुम्ही घरबसल्या विकू शकता.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कसलीही किचकट कागदपत्रं, करारनामे व लायसन्स सादर करावं लागत नाही, तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुमचा बिझनेस चालू करू शकता.

ठराविक कालावधी नंतर हवं तेव्हा वस्तू परत करू शकता आणि गुंतवेलेले पैसे परत घेऊ शकता.

कसलाही आर्थिक धोका नाही. एकदा तुम्ही नेहमीचे डीलर झालात कि पुष्कळ माल क्रेडीटवर सुद्धा मिळतो. त्यामुळे अशा प्रकारच्या मुक्त व स्वतंत्र डिलरशिपमधून तुम्ही उत्तम प्रकारे पैसे कमावू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा