रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

फ्रँचाईझ विकत घेताय? इथे एक नजर टाका म्हणजे नंतर पश्चाताप करावा लागणार नाही.


Franchising Tips for Marathi Business
जेव्हा एखादी कंपनी दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला वा कंपनीला काही ठराविक काळासाठी तिच्या वस्तू वा सेवा विकून नफा कमावण्याचे विशेष अधिकार देते, तेव्हा त्याला 'फ्रँचायझिंग' असं म्हणतात.

यात जी कंपनी ते विशेष अधिकार देते तिला 'फ्रँचायझर' आणि जी कंपनी ते अधिकार स्वीकारते तिला 'फ्रँचाईझी' असं म्हणतात. आणि हि जी गुंतवणूक आहे तिला 'फ्रँचाईझ' असं म्हणतात. 

यामध्ये 'फ्रँचाईझी' जी असते ती 'फ्रँचायझर'च्या प्रसिद्धिचा व नावलौकीकाचा वापर करून त्यांच्या वस्तू विकून नफा कमावते. आणि त्या नफ्यातून काही रक्कम फी म्हणून 'फ्रँचायझर'ला देते.

उदा. मॅकडॉनोल्ड हि एक कंपनी आहे, आणि जगभरात त्यांनी विविध व्यक्तींना वा कंपनींना फ्रँचाईझ दिलेल्या आहेत. मॅकडोनाल्ड त्यांच्या कंपनीची जाहिरात जिथे जिथे करते तिथले आ़जूबाजूचे त्यांचे ग्राहक जवळच्या फ्रँचाईझमध्ये जाऊन त्यांचे खाद्यपदार्थ खरेदी करतात.





अशाप्रकारे तुम्ही आधीपासूनच 'नाव' असलेल्या, व नफ्यात चालणार्‍या फ्रँचायझर कंपनीची फ्रँचाईझ घेऊन बिझनेस सुरू करू शकता. म्हणजे 'मी एफ.डी. केली', 'मी विमा पॉलीसी घेतली' तसं, 'मी फ्रँचाईझ घेतली' असं तुम्ही म्हणू शकता. मी 'फ्रँचाईझी' घेतली म्हणणं चुकीचं आहे.

तुम्ही 'फ्रँचाईझ' घेऊन 'फ्रँचाईझी' होता. हे अगदी नीट लक्षात ठेवा.  फ्रँचाईझ जवळपास प्रत्येक बिझनेसच्या असतात. तुम्ही तुमच्या आवडीने त्याची निवड करू शकता.  नुसतंच मोठमोठ्या जाहिराती बघून एखाद्या कंपनीची फ्रँचाईझ घेऊन नंतर नुकसानीत जाणारे अनेकजण असतात.

तुमची अवस्था त्यांच्यासारखी होऊ नये म्हणून फ्रँचाईझ घेण्याआधी काय काय तपासून घ्यावं ते आपण पाहू :-



१)  त्या फ्रँचाईजरच्या वस्तूला वा सेवेला बाजारात मागणी आहे का ? 

मागणी असेल तर ती तात्पुरती आहे कि भविष्यात वाढू शकते?
स्पर्धक कोण कोण आहेत? 
साधारणपणे किती पैशात ती फ्रॅंचाईझ चालू होऊ शकते हे बघा, म्हणजे आणखी किती लोक त्यात स्पर्धक म्हणून उतरू शकतात याचा अंदाज बांधता येईल.



२) वस्तू आणि सेवेचा दर्जा कसा आहे?  

स्पर्धकांच्या वस्तूचा दर्जा आणि तुमच्या फ्रँचायझरच्या वस्तूंचा दर्जा यात किती फरक आहे?

तुलनात्मकदृष्ट्या कुणाचा दर्जा जास्त चांगला आहे ?

त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरची अपेक्षा काय आहे?

तुमच्या एरियातून तुम्ही यशस्वीपणे त्या वस्तू वा सेवा विकू शकाल याची तुम्हाला खात्री वाटते का?

नुसतचं फ्रँचायझ प्रॉफिटेबल असून उपयोग नाही, ती चालवायला तसं प्राईम लोकेशन पाहिजे, तशी मोक्याची जागा आहे का तुमच्याकडे ?



३) फ्रँचायझर किती जुना आहे? 

 त्याचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्याची रेप्युटेशन कशी आहे मार्केटमध्ये?
आधीच्या 'फ्रँचायझी' त्याच्याबरोबर काम करून फायद्यात आहेत का? 
त्यांचा काय अनुभव आहे?

४) तुमच्यामध्ये आणि फ्रँचायझर मध्ये 'फ्रँचाईझ करार' होणार आहे का? 

असल्यास त्याचे नियम व अटी हे एका त्या विषयातील जाणत्या कयदेशीर सल्लागाराकडून तपासून घ्या. फ्रँचाईझ सरेंडर कधी आणि कशी करायची, त्याचे नियम, अटी व बंधनं काय काय आहेत ?



५) फ्रँचायझर आर्थिकदृष्ट्या समर्थ आहे का? त्यांची कंपनी कर्जबाजारी तर नाही ना?  

तुम्ही पैसे भरून फ्रँचाईझ घेतल्यावर काही महिन्यांनी वा वर्षांनी लगेच ती कंपनी बंद होण्याची चिन्हं तर दिसत नाहीयेत ना?

त्यांच्यावर फ्रँचाईझच्या बाबतीत काही कायदेशीर केसेस व बंधनं वगैरे नाहीत ना ?

६) 'फ्रँचायझी फि' किती आहे आणि ती कशी भरायची आहे?  


ती भरायला उशीर झाल्यास दंड आहे का ? असल्यास किती टक्के ?

 फीच्या बदल्यात काय काय सोई-सुविधा तुम्हाला मिळणार आहेत?

फ्रँचाईझ चालवताना कुठल्या कुठल्या गोष्टीत ते तुम्हाला सहकार्य करणार आहेत?

स्टाफ ठेवणं बंधनकारक असेल तर त्यांचा गणवेश कोण देणार, त्यांना जॉब ट्रेनिंग देण्याची जवाबदारी कोणाची ?

मार्केटींग व जाहिरातींचं मटेरियल महिन्यातून किती वेळा आणि कसं पाठवणार ?



७) फ्रँचायझरचे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत?  


कुठे कुठे आणि कसकसा बिझनेस वाढवणार आहे?

तुमच्याच एरीयात वा जवळपास इतर कुणाला दुसरी फ्रँचाईझ तर ते देणार नाहीयेत ना?

नवीन प्रॉडक्ट्स कुठले लाँच करणार आहेत?

त्यांच्या स्वतःच्या फायद्याबरोबर फ्रँचायझीच्या फायद्याचे निर्णय ते घेतात का? वेळोवेळी होणार्‍या त्यांच्या फ्रँचायझींच्या सभा व सेमिनार्सना उपस्थित रहात जा म्हणजे याविषयी अद्ययावत माहिती मिळत जाईल.

आता वर दिलेली प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायची गरज नाही, कारण बिझनेस मॉडेल नुसार त्यात फरक पडतो. त्यामुळे जसं बिझनेस मॉडेल असेल तशा प्रकारचे त्याला अनुकूल असे प्रश्नं त्या फ्रँचायझरला विचारा व व्यवस्थित माहिती करून घ्या.

इथे सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे कि फ्रँचाईझच्या बिझनेस मध्ये उतरणारच आहात तर डोळसपणे निर्णय घ्या. तुमच्या नवखेपणाचा कुणी गैरफायदा घेऊ नये म्हणून या विषयात तुम्हाला ज्ञानी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 

या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा