शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

गुंतवणूकीबद्दल जाणकारांचे बोल जे तुमचा दृष्टिकोन बदलून टाकतील

Marathi Business Tips on Investment

गुंतवणूक म्हटलं कि मनात सर्वात आधी येणारे शब्द म्हणजे: जोखीम, नफा आणि नुकसान. पैशाचे व्यवहार कळायला लागल्यापासून असे काही  किस्से आपण एकलेले असतात, कि सहज जरी कुणी 'अरे, एक चांगली स्कीम आहे, करतो का इन्व्हेस्ट?' असं विचारलं तरी बर्‍याच जणांना धडकी भरते.

अशा वेळी ते लोक लगेच त्यांना माहित असलेल्यांपैकी 'कुणीतरी कसा डुबला, कर्जबाजारी झाला' या पठडीतले किस्से सांगून टाकतात, आणि 'म्हणून सांगतो नको रे बाबा रे ते. मोह फार वाईट.' इथे येऊन विषय संपवतात.



आपली ईच्छा असो वा नसो, अवतीभवती चालू असणार्‍या असल्या संभाषणांचा आपल्यावर कळत नकळतपणे प्रभाव पडत असतो. आणि त्यांना बळी पडून आपण आपले गुंतवणूकीसंदर्भातले निर्णय घेण्याची शक्यता बळावते.

इथून पुढे असं होऊ नये, चूक काय, बरोबर काय ते कळावं, याची सुरूवात म्हणून इथे काही जाणकार व अभ्यासू गुंतवणूकादारांचे विचार देत आहे. वेगवेगळ्या संदर्भात या विचारांचा अभ्यास केल्यास त्याचा  फायदा होईल.


"ज्ञानात केलेली गुंतवणूक सगळ्यात चांगलं व्याज देते" - बेंजामिन फ्रँकलिन

"शेअर मार्केट अशा लोकांनी भरलेलं आहे कि ज्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत माहिती आहे, पण कशाचंही मूल्य माहिती नाही."- फिलिप फिशर

"गुंतवणूकीमध्ये जे सोयीचं असतं ते क्वचितच फायद्याचं असतं"- रॉबर्ट आर्नोट

"अधून मधून एखाद्या वेळी, मार्केट असा काही मूर्खपणा करतं, कि ज्यामुळे तुमचा जीव वरखाली होतो"- जिम क्रॅमर



"वैयक्तिक गुंतवणूकदाराने कायम गुंतवणूकदारासारखेच वागले पाहिजे, भविष्यकारासारखे नाही"- बेन ग्रॅहम

"तुम्ही किती पैसे मिळवता याला तितकंसं महत्त्व नाही, पण तुम्ही किती पैसे टिकवता, ते तुमच्यासाठी कसे उपयोगी पडतात, आणि किती पिढ्यांपर्यंत तुम्ही ते टिकवता हे महत्त्वाचं"- रॉबर्ट कियोसाकी

"काय तुमच्या मालकीचं आहे हे लक्षात असू द्या, आणि ते का तुमच्या मालकीचं आहे हे देखील "- पीटर लिंच
"गुंतवणूकीतील सर्वाधिक घातक चार शब्द म्हणजे:- 'यावेळी हे वेगळं आहे'"- सर जॉन टेंपल्टन

" वैविध्य फक्त तेव्हाच गरजेचं असतं जेव्हा गुंतवणूकदारांना समजत नाही कि ते काय करतायत"- वॉरन बफे
गुंतवणूकीचं जग हे कधी थंड कधी गरम असं असतं. पण डोकं ठिकाण्यावर ठेऊन, व्यवस्थित अभ्यास करून निर्णय घेतलेत तर दीर्घकालीन यश मिळण्याची शक्यता असते. तुम्हाला जर कधी शंका वाटायला लागली तर उपरोक्त जाणकार व अनुभवी व्यक्तींचे हे विचार अधूनमधून वाचत चला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा