शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

पुढची 'क्लायंट मिटींग' यशस्वी करायची असेल तर या 'सेल्स टिप्स' वाचाच

Sales Tips in Marathi Business
तुमच्या बिझनेसची जाहिरात बघून तुमच्या एका संभाव्य ग्राहकाने समजा तुम्हाला फोन केला, आणि तुमच्या प्रॉडक्ट विषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला भेटायला बोलावलं, तर तुम्ही त्यांच्याशी कशाप्रकारे बोलता?

तुमच्या बाबतीत असं किती वेळा घडलंय कि, तुम्ही भेटायला गेलात, सगळी माहिती देऊन झाली आणि लगेचच समोरच्या माणसाने तुमची वस्तू विकत घ्यायला नकार दिला?

तुम्ही स्वतः जात नसाल, आणि तुमच्याकडे कामाला असलेल्या सेल्समनला पाठवत असाल,  तर तो किती वेळा नकार ऐकून परत आला आहे?

तुमच्या 'सेल्स् प्रेझेंटेशन'ला तुमच्या संभाव्य ग्राहकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा आणि तुमचं प्रॉडक्ट व सेवा विकली जावी, यासाठी या काही बेसिक पण महत्त्वपूर्ण अशा टीप्स् :-




१) तुम्ही काय सांगता हे महत्त्वाचं नाही; तुमच्या ग्राहकाला काय पटतं ते महत्त्वाचं आहे.

'सेल्स प्रेझेंटेशन' दिल्यावर तुम्हाला वाटू शकतं कि तुम्ही 'द बेस्ट' असं प्रेझेंटेशन दिलंय, सगळे मुद्दे कवर केलेत आणि तुमचं काम झालंय. पण  तुमच्या ग्राहकाला जर तुमचं म्हणणं नीट समजलेलंच नसेल, तर केलेल्या आटापिट्याचा काय उपयोग ? असं एकतर्फी असलेलं कोरडं प्रेझेंटेशन कधी देऊ नये.

ग्राहकाशी संवाद साधण्याला थोडा वेळ द्या. त्यांना प्रश्नं विचारा, त्यांच्या अपेक्षा व गरजा जाणून घ्या. शक्य आहे कि, कधी कधी त्यांना पण माहिती नसतं कि नक्की त्यांना कशाची गरज आहे, तेव्हा अशा वेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे तुमचं काम आहे. तुमचं म्हणणं त्यांना कळणं व पटणं हे दोन्ही गरजेचं आहे. 




२) 'सेल्स कॉल' ला जाताना कधीही पूर्वतयारीशिवाय जाऊ नका.

प्रवासाला निघाल्यावर कुठे जायचंय हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर तिथे तुम्ही पोहोचणार कसे? प्रेझेंटेशनमधला सामान्यपणे विसरला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, 'क्लोज'. त्याचा आवश्यक तेवढा सराव करा.

व्यवस्थित आखणी करून नेमकं काय बोलून झाल्यावर, किती वेळाने नेमक्या कुठल्या जागी 'क्लोज' करायचा, हे आधीच ठरवून ठेवा. याचा अर्थ एकच पठडीबाज प्रकार सारखा सारखा वापरायचा, असं नाही. 

वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची विक्री कौशल्य वापरायची(गरज वाटली तरच). ग्राहक काय बोलतो, कसा प्रतिसाद देतो हे बघून योग्य ती अ‍ॅक्शन घ्यायची.



३) संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी रोज वा आठवड्यातून काही तास असा वेळ राखून ठेवा आणि तो कटाक्षाने त्याच कामासाठी वापरा.

संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधणं सोडून बाकीचे सगळे प्रकार करण्यातच बरेचजण धन्यता मानतात. तुम्ही जर ते तुमच्या दिनक्रमानुसार नीट वेळापत्रकावर लावून ठेवलं नाहीत तर तुम्ही देखील इतरांप्रमाणे सोईस्कररीत्या दुर्लक्ष कराल. ज्यामुळे तुमचंच नुकसान होईल. तेव्हा असं होऊ देऊ नका.



४) स्वतःच्या विक्री कौशल्यावर आणि तुम्ही जे तुमच्या ग्राहकांना विकणार आहात त्या वस्तू/सेवेवर विश्वास ठेवा.

तुम्ही जे विकत आहात, त्यावर जर तुमचाच विश्वास नसेल तर ज्याला तुम्ही ते विकता आहात तो तरी त्यावर विश्वास ठेऊन तुमच्याकडून ते कसं काय विकत घेईल? याचा नीट विचार करा.

हेच कारण आहे कि बोलण्याची कला साध्य असणारे, आत्मविश्वास असणारे विक्रेते इतरांपेक्षा जास्त यशस्वी असतात. त्यांच्यापैकी एक होण्याचा प्रयत्न करा.



५) काहीही झालं तरी ठरलेल्या भेटीला हजर रहा आणि तेसुद्धा वेळेवर.

केवळ वेळ न पाळल्यामुळे अपयशी झालेले बरेचसे विक्रेते आहेत. इतकी साधी आणि लहानपणापासून शिकत आलेली गोष्ट सुद्धा लोक पाळू शकत नाहीत, हे निराशाजनक आहे.

म्हणूनच 'नोकरी देणे' च्या सगळ्या जाहिरातींमध्ये सेल्समेनच्या नोकरीसाठी सगळ्यात जास्त जाहिराती असतात.

शिस्तबद्धता हि जशी प्रत्येक क्षेत्रात लागते तशीच 'सेल्स' सारख्या सामान्य व कमी महत्त्वाच्या वाटणार्‍या पण प्रत्यक्षात सगळ्यात जास्त महत्त्व असणार्‍या क्षेत्रात सुद्धा लागते, हे लक्षात असू द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा