शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

बिझनेसच्या भांडवलासाठी पैसा गोळा करण्याकरता हुकुमाचा एक्का


Marathi Business Funding Tips
मागे एका लेखात बिझनेससाठी भांडवल कसं उभं करायचं हे तुम्ही वाचलं. त्यात जे मार्ग दिलेले आहेत  त्यातून तर पैसे उभे करता येतीलच.

पण आणखी एक महत्त्वाचा पर्याय 'हुकुमाचा एक्का' म्हणून इथे कामी येऊ शकतो.

तुम्ही जर तो वापरलात तर त्याच्यामार्फत आलेला पैसा तुम्हाला कधीही कुणालाही परत करावा लागणार नाही कि त्या पैश्यावर कसलंही व्याज वा परतावा सुद्धा द्यावा लागणार नाही.

तो पैसा सर्वस्वी तुमचा असेल.


जाणून घ्यायचयं, तो हुकुमाचा एक्का कोण आहे ते ?

तो आहे...  तुम्ही स्वतः !.

होय.

तुम्ही म्हणजे तुमच्या अंगी असलेले कलागुण.

तुमच्या कलागुणांचा हुशारीने वापर करून आणि त्यांना व्यवसायाचं स्वरूप देऊन तुम्ही तुमच्या बिझनेससाठी आवश्यक तेवढं भांडवल उभे करू शकता.

ते कसं करायचं ते आता आपण पाहू:-



एक कोरा कागद व पेन घ्या. त्यावर तुमच्या अंगी असलेले कलागुण, तुमचे छंद, आवडी-निवडी वगैरे या  विषयीची यादी करा.

त्यातून तुम्ही कशा कशात पारंगत आहात ते निवडा.

आता त्यापैकी तुम्ही काय काय आत्मविश्वासाने लोकांना शिकवू शकता ते ठरवा आणि त्याचा वापर करून पैसे मिळवा.
उदा. समजा तुम्हाला गिटार वा हार्मोनियम खूप छान वाजवता येतं, तर तुम्ही घरच्याघरी गिटार-हार्मोनियमचे क्लासेस घेऊ शकता व त्यातून पैसे मिळवू शकता. चित्रकला व हस्तकला चांगली असेल तर त्याचे वर्ग घेऊ शकता. केक बनवणे, चॉकलेट बनवणे, इमिटेशन ज्वेलरी, वगैरे असे अनेक प्रकार आहेत ज्याचे तुम्ही घरबसल्या क्लासेस घेऊ शकता.



समजा, तुम्हाला यापैकी काहीही येत नाही, तर तुमच्यासाठी आणखी एक पर्याय आहे.

तो म्हणजे "स्वतंत्र सल्लागार" होण्याचा.

वर नमूद केल्याप्रमाणे आवडीचे विषय निवडा. त्यातील आवश्यक तेवढं ज्ञान संपादन करा आणि त्या विषयातील सल्लागार म्हणून व्यवसाय चालू करा.

ऑनलाईन, ईमेलवरून, फोनवरून किंवा  प्रत्यक्ष असं कुठेही तुम्ही तो व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला जर का बोलण्याची कला साध्य असेल, तुम्ही सांगितलेलं लोकांना समजत असेल-पटत असेल, तर या माध्यमातून तुम्ही उत्तम पैसे मिळवू शकता.

तासाला किमान रु. ५००/- पासून ते ५०००/-  पर्यंत कमावणारे सल्लागार आहेत. नुसत्या सल्ल्यावर न थांबता  त्या विषयाशी संबंधित कार्यशाळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यातूनही वेगळे पैसे मिळतील.

आता नेमक्या कुठल्या विषयात सल्लागार व्हावं हे जर तुम्हाला कळत नसेल किंवा तुमच्याकडे असं कुठलंही इतरांना शिकवण्याइथपत ज्ञान नसेल तर त्यावर उपाय म्हणजे सरळ एखादा कोर्स करा आणि ते शिकून घ्या.

केलेला अभ्यास आणि ज्ञान कधीही वाया जात नाही. आणि आजच्या माहितीच्या युगात तर नाहीच नाही.

तेव्हा तुम्हाला रस असलेल्या विषयाचा एखादा शॉर्ट टर्म कोर्स करा आणि त्यावरचे सल्लागार  व्हा.

खूप कठीण आणि गहन विषय  नको असतील तर साधे सोपे विषय निवडा.
उदा. शेअर मार्केट, रिअल ईस्टेट, इंटेरीयर डिझाईन, गार्डन डिझाईन, पेट ग्रूमिंग (पाळीव प्राण्याची काळजी व निगा), ट्रॅवल गाईड, फोटोग्राफी, फॅशन डिझाईन, व्यक्तिमत्त्व विकास, इ.

अनेक विषय आहेत ज्यासाठी लोकांना सल्ल्याची आणि सल्लागाराची गरज भासते.

तुम्ही त्यापैकी एक होऊ शकता आणि उत्तम पैसा मिळवू शकता. तुमच्या डोक्यात असलेला बिझनेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जमा झाला कि तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता.

कुणाच्याही परवानगीची गरज नाही.  तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसचा श्रीगणेशा करु शकता. या मुद्द्याचा नीट विचार करा आणि लगेच यादी करायला घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा