गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

उद्योगधंद्यासाठी भांडवल उभे करण्याचे ३ उपयुक्त पर्याय

Marathi Business Funding Ideas
कुठलाही बिझनेस सुरू करायचा म्हटलं कि त्याच्या सुरूवातीलाच मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे "भांडवल कसं उभं करायचं?". पैसा कोण देणार त्यासाठी?

"पैशाचं सोंग आणता येत नाही" आणि "पैसे काही झाडाला लागत नाहीत" इथपासून ते "आपण काही जहागीरदाराचे लेक नाही" आणि "अफ्रिकेत आपला कुणी काका नाही बसलाय आपला नावाने इस्टेट करून मरायला" इथपर्यंत, हे सगळं काही तुम्ही लहानाचं मोठं होत असताना अनेक वेळा कुणाच्या ना कुणाच्या तरी तोंडून ऐकलेलं असेल. घरात नुसता बिझनेसचा विषय जरी काढला तरी त्यांच्या दृष्टीने आपण 'वाया गेलेलो' असतो.

आपल्याकडे पालकांच्या दृष्टीने मुलांच्या (Boys) आयुष्याचा क्रम हा साधारणपणे असा असतो:-
भरपूर अभ्यास --> पुष्कळ मार्क्स --> परीक्षेत घवघवीत यश --> लठ्ठ पगाराची नोकरी --> चांगल्या घरातील (शक्यतो 'आपल्यातलंच') स्थळ --> साधेपणाने लग्न --> दोन नातवंडं(पहिलं तर वर्षाच्या आतच)  --> सुखाचा संसार.





या बाबतीत वाद घालण्याची सोय नसते. आणि समजा वाद घालण्याची सोय असली, तरी ती फक्त वादापुरतीच मर्यादित रहाते. त्यातून हाती काहीच लागत नाही.  अशा वेळी इतरांकडून अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नसतो. मग अशा वेळी करायचं काय, बिझनेसची स्वप्नं सोडून द्यायची का?

तर नाही. कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही. प्रयत्न करत रहायचं आणि मार्ग शोधत रहायचं. प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली कि यश मिळतंच. तुम्ही सुद्धा तुमच्या उद्योगधंद्यासाठी भांडवल उभं करण्यासाठी धडपडत असाल, तर तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळावी म्हणून बिझनेससाठी पैसा उभा करण्याचे ३ पर्याय  इथे देत आहे.  




१) एंजल इन्वेस्टर वा प्रायव्हेट इन्वेस्टर

याचा शब्दशः अर्थ होतो, 'देवदूत गुंतवणूकदार'.

म्हणजे भांडवलासाठी पैसे मागण्यासाठी जर तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला खूप कागदपत्रं सादर करावी लागतात तसेच गॅरेंटर द्यावा पण लागतो.

पण 'एंजल इन्वेस्टर' हि एक स्वतंत्र व्यक्ति असते. तुमच्या बिझनेस मध्ये पैसा गुंतवायचा कि नाही याचा निर्णय घ्यायला हि एक व्यक्ति समर्थ असते.

तुमची उद्योगाची कल्पना जर त्याला आवडली तर तो लगेच तुम्हाला फायनान्स् करू शकतो. देवदूतासारखा मदतीला धावून येतो, म्हणून कदाचित 'एंजल' म्हणत असतील.

सर्वसाधारणपणे हि अशी श्रीमंत लोक असतात ज्यांच्याकडे स्वतःचा साठवलेला पैसा असतो किंवा वडिलोपार्जित इस्टेटितून आलेला असतो. (उदा. निवृत्त शासकिय अधिकारी, शेअर मार्केट मधली यशस्वी माणसे, अनिवासी भारतीय, आय्.टी. प्रोफेशनल्स, वगैरे). आता जिकडे तिकडे असे 'एंजल इन्वेस्टर' वाढू लागल्यामुळे कधी कधी 'एंजल इन्वेस्टर' म्हणून दोन वा त्यापेक्षा जास्त माणसे वा संस्था देखील असू  शकतात.



२) बॅंक, पतपेढी व फायनान्स कंपन्या

सगळ्यांना माहिती असलेला असा हा दुसरा मार्ग. तुमच्याकडे चार्टर्ड अकांऊंटंटने तयार करून दिलेला वा साक्षांकित केलेला असा प्रोफेशनल 'बिझनेस प्लॅन' असेल. इतर आवश्यक कागदपत्रं असतील, तर बँकेत बिझनेस लोनसाठी अर्ज करायला हरकत नाही.

जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रं आणि गॅरेंटर नसेल तर बँकेत (आडमार्गाने, वगैरे) वेळ वाया घालवू नका. दुसरे पर्याय बघा.

गावाकडे पतपेढ्या असतात, त्यांचे नियम थोडे लवचिक असतात. आणि तरूण उद्योजकांना ते सहकार्य करतात. त्यात तुमच्या बाजूने शब्द टाकणारी कुणी मोठी व्यक्ति असेल तर तुमचं काम तिथे होऊ शकतं.  फायनान्स कंपन्या हा त्यातल्या त्यात सोपा वाटणारा मार्ग आहे.

 एक म्हणजे बँकेच्या तुलनेत त्यांना  कागदपत्र कमी लागतात, आणि दुसरं म्हणजे त्यांची लोन्स् लवकर (अगदी आठवड्याच्या आत) पास होतात. त्यामुळे इथे तुमचं भांडवल लवकर उभं राहू शकतं.

३) मित्र आणि नातेवाईक



तुमचं मित्रांचं टोळकं मोठं असेल वा तुम्ही जर नातेवाईकांशी संबंध ठेऊन असाल तरच या पर्यायाचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. बर्‍याचवेळा आपल्याकडे कुणी थोडा दूरचा (मावस-मामे-चुलत वगैरे) मोठा दादा वा मामा असतो, त्यालादेखील त्याच्या तरूणपणी बिझनेस करायची ईच्छा असते, पण परिस्थितीमुळे तो ते करू  शकलेला नसतो. असं तुमच्या नात्यात कुणी आहे का याचा विचार करा.

त्याला शोधून काढा, प्रत्यक्ष जाऊन भेटा आणि तुमच्या बिझनेस विषयी सांगा. (कदाचित हे थोडं मतलबीपणाचं वाटेल, कारण आजकाल मोबाईल आणि इंटरनेटच्या अलिप्त युगात प्रत्यक्ष नाती सांभाळणं होत नाही. आणि आता गरज आहे म्हणून असं डायरेक्ट भेटायला जायचं वगैरे. पण काळ-वेळ बदलतीये, तेव्हा आपणही जुळवून घ्यायचं.)

तो जो कुणी दादा-मामा-काका असेल, तो तुमचा समविचारी असल्यामुळे, आणि याआधी त्या वाटेवरून गेलेला असल्यामुळे तुमच्या मनातील नेमकी भावना बाकिच्यांपेक्षा त्याला चांगली समजेल. आणि त्यामुळे तो तुम्हाला काही मदत करू शकेल. त्याला स्वतः पैसा गुंतवायला जमलं नाही तरी त्याच्या ओळखीत कुणाकडे तरी तुमच्यासाठी शब्द टाकेल.

अशा प्रकारे मित्र, नातेवाईक, शेजारी-पाजारी, इकडे-तिकडे कुणी सहज म्हणून भेटलेली ओळखी-पाळखीची माणसं, यांच्यापैकी कुणीही तुम्हाला अनपेक्षितपणे भांडवलासाठी पैसा देऊ शकतं. तुम्ही फक्त आशावाद कायम ठेवा आणि सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत रहा.

तर अशाप्रकारे व्यक्ति शोधून तुम्ही त्यांना तुमचा बिझनेस प्लॅन सांगून त्यांच्याद्वारे पैसा उभा करू शकता.
अशा वेळी त्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला त्यांना तुमच्या कंपनीत काही टक्क्यांची भागीदारी द्यावी लागते, किंवा नफा थोडा जास्त द्यावा लागतो किंवा इतर काही अटी-नियम तुम्ही तुमच्या पातळीवर बोलू शकता. तुम्ही जर सादरीकरण आणि संभाषण कौशल्यामध्ये पारंगत असाल, तर तुम्हाला हे सहज जमू शकतं.



आता वर ३ पर्याय दिले आहेत म्हणून घाईघाईने निर्णय घेऊ नका. नीट अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार करा.  कारण प्रत्येक पर्यायासाठी करावी लागणारी पूर्वतयारी वेगवेगळी असणार आहे.

मित्र-नातेवाईक वगैरे लोकांना तुम्ही भावनिक होऊन, उत्साहाने बिझनेस विषयी सांगाल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास बघून वा कौतुकाने ते तुम्हाला पैसे देतील.

पण तेच बँका-पतपेढ्या-फायनान्स कंपन्या इथे तुम्हाला रितसर कागदपत्रं आणि 'बिझनेस प्लॅन' घेऊनच जावं लागेल. तिथे भावनिक होऊन चालणार नाही.

'एंजल इन्वेस्टर' जर का एक व्यक्ति असेल तर त्याला पटवणं सोपं जाईल, पण ती जर का अनुभवी इन्व्हेस्टर्स एकत्र येऊन निर्माण झालेली संस्था असेल तर त्यांना पटवणं महाकठीण काम असेल.

अशा प्रकारे वेगवेगळ्या पातळीवर जाऊन प्रत्येक पर्यायाचा वेगळा विचार करा. त्यापैकी तुम्हाला सोईचा वाटेल तो पर्याय निवडा आणि  पुढे मार्गक्रमण करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा