शुक्रवार, १८ जून, २०१०

आमची कुठेही शाखा नाही

' आमची कुठेही शाखा नाही !' एक  सुप्रसिद्ध उपहासात्मक वाक्य.

बर्‍याच वेळा लोक या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतात, त्यांना माहितीच नसतं कि हे वाक्य, कुठे , कधी आणि का वापरतात ते. आणि याचा नेमका अर्थ काय ते. 


 एखाद्या दुकानावर ' आमची कुठेही शाखा नाही ' अशी पाटी दिसली की बघणार्‍या लोकांना वाटतं,
' बघा हा माणूस , याच्या व्यवसायाची-दुकानाची कुठेही शाखा नाही हि तर खरी दु:खाची गोष्ट वाटायला पाहिजे याला, आणि त्याने  व्यवसाय वाढवून अनेक शाखा सुरू करायला पाहिजेत. पण इथे हा तर मूर्खासारखं अभिमानाने स्वतःची अधोगती, नाकर्तेपणा मिरवतोय, याला लाज कशी नाही वाटत ?'  विशेष करून मराठी व्यावसायिकांना-दुकानदारांना चिडवण्यासाठी, ते किती कूपमंडूक वृत्तीचे आहेत हे दाखवून देण्यासाठी, आणि स्वतःच्या अधोगती चा सुद्धा त्यांना किती अभिमान आहे., हे दाखवण्यासाठी, वगैरे  अशा कारणांसाठी हे वाक्य आपलेच लोक ( ..हे विशेष ! ) वापरतात.   नुकताच आपण या वाक्याचा उल्लेख ' मी शिवाजी राजे बोसले बोलतोय ' या सुपरहीट मराठी चित्रपटात पाहिला.  तिथेही हे वाक्य, मी वर म्हटल्याप्रमाणेच  चुकीच्या  समजूतीने वापरलं गेलं.  तेव्हा म्हटलं आज हा गैरसमज दूर करावाच.....



तर त्याचं असं आहे मंडळी, कि , बाजारातून आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण कसं आपल्या आवडत्या / ठरलेल्या दुकानातूनच ती वस्तू विकत घेतो.  का बरं ?  कारण, आपल्याला त्या दुकानाचा अनुभव असतो, आपल्याला माहिती असतं कि त्या दुकानातून विकत घेतलेल्या वस्तू अतिशय उत्तम दर्जाच्या आणि दिर्घकाळ टिकणार्‍या आहेत.  त्या दुकानातील दुकानदार, त्यांचे विक्रेते हे सगळे ग्राहकांशी खूप चांगल्या प्रकारे वागतात. कितीही वेळा कपडे (विशेषतः साड्या आणि दागिन्यांची दुकानं), दागिने बदलून बघितले, तरी ते चिडत नाहीत, वैतागत नाहीत. आपल्याला पसंत पडे पर्यंत वेगेवेगळ्या डिझाईन्स् दाखवत रहातात. ग्राहकांच्या कायम संपर्कात राहून त्यांना नवीन आलेल्या वस्तूंची माहिती देतात. .इतकं चांगलं वागतात, कि आपण मनाशी घट्ट ठरवतो, कि जग इकडचं-तिकडे झालं तरी , मी अमुक-अमुक दुकानातूनच कपडे / दागिने घेईन. म्हणजेच आपल्या मनात त्या दुकानाविषयी एक 'इमेज'  तयार झालेली असते.

अशाच वेळी दुसरीकडे शहराच्या एका वेगळ्या भागात, (कदाचित तुमच्या घरापसून थोड जवळच्या अंतरावर आणखी एक कपडे/दागिन्याचं उघडतं, तुम्ही त्यांच्या दुकानात जाऊन बघता , तर आतमधली कपड्याची/दागिन्यांची डिझाईन्स्  सेम असतात, फर्निचर, दुकानाचा बोर्ड , अगदी पायपुसणं सुद्धा 'तुमच्या  नेहमीच्या ' दुकानासारखं असतं. त्यामुळे तुम्हाला वाटतं, चला, घराच्या जवळच दुकान झालं ते बरं झालं, तुम्ही तिकडे जाता ....त्या दुकानातून वस्तू विकत घेता.....ती वस्तू दिसायला हुबेहुब ' तुमच्या नेहमीच्या ' दुकानातल्या सारखी असते, पण अत्यंत कमी दर्जाची असते. त्या नवीन दुकानात मिळणारी वागणूक चांगली नसते, विक्रेते उर्मटपणे वागतात, आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टींचं खापर तुमच्या नेहमीच्या दुकानावर फोडता. तुम्ही विचार करता,कि ' आधी यांचं एक दुकान होतं , तेव्हा इतकं चांगलं वागायचे ग्राहकांशी, आता जास्त पैसा हातात आला, नवीन दुकान उघडलंय, म्हणून माज चढलाय  साल्याला '  मग तुम्ही त्यांच्या वस्तूंची इतर लोकांकडे बदनामी करता, आणि आयष्यात पुन्हा कधीही त्या दुकानाची पायरी चढत नाही. आणि तुमच्या त्या नेहमीच्या दुकानातल्या विक्रेत्याला, यातलं काहीही माहिती नसतं, कारण ते दुकानच मुळात त्याचं नसतं. अशाप्रकारे कही चूक नसताना देखील तुमच्या त्या नेहमीच्या दुकानाचा धंदा बसतो. आणि तुमच्या मनातून सुद्धा ते उतरतात.



 आता वास्तविक ते नवीन दुकान आणि तुमचं नेहमीचं ठरलेलं दुकान याचा काहीही संबंध नसतो. तुमच्या नेहमीच्या दुकानात होणारा खप, त्यांची कमाई, त्यांच्या स्पर्धकांच्या डोळ्यात सलत असते, म्हणून त्या दुकानाचे ग्राहक तोडण्यासाठी, त्यांची बदनामी करण्यासाठी, किंवा मग बाजारात त्यांच्या वस्तूंना असलेली मागणी आणि त्यांच्या दुकानाची व वस्तूंची लोकप्रियता याचा आयता उपयोग आपल्या कमी दर्जाच्या वस्तू , बेकार माल खपवण्यासाठी काही लोक अशा खोट्या पद्धतीने व्यवसाय करतात्/दुकान चालवतात.

तर अशा प्रकारे आपल्या विश्वासू ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांनी त्या खोटारड्या दुकानात जाऊ नये, कायम थेट आपल्या दुकानातूनच वस्तू खरेदी कराव्यात. यासाठी अशी प्रामाणिक आणि लोकप्रिय दुकानं, आपापल्या दुकानात असा बोर्ड लावतात , कि - " आमची कुठेही शाखा नाही " .

( एका वाक्यात याचा गर्भित अर्थ :-  शिस्तित आमच्याकडेच या, भलतीकडून वस्तू विकत घेऊ नका, फसवणूक झाली, माल खराब निघाला , तर आम्ही जबाबदार नाही, कारण मुळात ते दुकानच आमचं नाही. )
हुश्श.......

३ टिप्पण्या:

  1. tumche mhanane barobar aahe... pan "Shivajiraje""" chitrapatat jo view dakhavila aahe... tyacha arth asa hoto ki marathi lokanni ekach thikani shakha na tevata tyacha as a retail chain vistar kela pahije...
    mazha view ha...

    उत्तर द्याहटवा
  2. पटलं एकदम!!!! ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय्‌’ पाहिल्यावर ‘ते’ वाक्य मलाही असंच खटकलं होतं. पण exactly काय खटकलं होतं ते आत्ता कळालं

    उत्तर द्याहटवा
  3. दोघांनाही प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

    @ विश्वास - तुमचा दृष्टीकोन सुद्धा बरोबर आहे. चित्रपटात ज्या उद्देशासाठी ते वापरलं, तो ही योग्य आहे. माझी हि पोस्ट फक्त गैरसमज दूर करण्याकरता आहे.

    उत्तर द्याहटवा